Tuesday, July 5, 2022

 आषाढी एकादशी व बकरी ईद परस्पर स्नेहाने जपत साजरी करू

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

▪️शांतता समितीच्या बैठकीत सर्व धर्मीयांचा निर्धार

नांदेड (जिमाका) दि. 5 :- येत्या 10 जुलै रोजी घराघरात श्रद्धेने जपली जाणारी आषाढी एकादशी व मुस्लीम धर्मात कर्तव्य म्हणून साजरी होणारी बकरी ईद लक्षात घेता एकमेकांच्या श्रद्धेचा आदर बाळगून नांदेड जिल्ह्यात दोन्ही सण शांततेत साजरा करण्याचा निर्धार आज सर्व धर्माच्या प्रमुखांकडून घेण्यात आला. नांदेड जिल्ह्यात परस्पर स्नेह व शांतता याला नांदेड जिल्हावासियांनी आजवर प्राधान्य दिले आहे. एखादा अनुचित प्रकार गैरसमजातून झाल्याचे तर काही ठराविक एक, दोघांकडून झालेल्या चुकीमुळे आढळून आले. हा जिल्हा शांतताप्रिय असून याला कोणत्याही परिस्थितीत गालबोट न लागू देता सामाजिक शांततेवर अधिक भर देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, शांतता समितीचे सन्माननिय सदस्य, हॅपी क्लबचे पदाधिकारी, धर्मगुरू आदी उपस्थित होते. 

विविध धार्मिक सण, उत्सव साजरे करतांना कायद्याने आखून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. उत्साहाच्या भरात कायद्याचे कोणाकडून उल्लंघन होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. जिथे कुठे कोणी कायद्याचे पालन करणार नसेल तर तात्काळ संबंधिता विरुद्ध पोलीस विभागातर्फे कारवाई केली जाईल. सण, उत्सव हे आनंदासाठी असतात. आपण सर्वधर्मीय एकमेंकांच्या आनंदासाठी कटिबद्ध होऊन कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले. यावेळी श्रीमती साखरकर, मौलाना अय्युब कासमी, भदन्त पय्या बोधी व इतर मान्यवर उपस्थित होते.
00000





No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...