Saturday, July 16, 2022

 राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका

असतील त्या टप्प्यावर 30 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलल्या

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन तसेच वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. भारतीय हवामान खात्याकडून बऱ्याच भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागात एनडीआरएफची पथके दक्ष ठेवण्यात आलेले आहेत. ही सर्व परिस्थिती विचार घेऊन जनजीवन व वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी काही कालावधी लागेल. अशा स्थितीत निवडणुकीसाठी पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निर्विघ्न पार पडणे आव्हानात्मक आहे. याबाबीचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकल्याणात आल्याचे आदेश निर्गमीत केले आहेत.

 

राज्यातील निवडणूकीस पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांची संख्या 32 हजार 743  पैकी निवडणूक प्रक्रिया सुरू असणाऱ्या 7 हजार 620 इतक्या सहकारी संस्था आहेत. यात 250 किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळलेल्या आहेत. यातील निवडणूक प्रक्रिया सुरू असणाऱ्या संस्थांपैकी नामनिर्देशन सुरू असणाऱ्या सहकारी संस्था 5 हजार 636 एवढ्या आहेत. नामनिर्देश सुरू न झालेल्या सहकारी संस्था 1 हजार 984 इतक्या आहेत. बहुतांश सहकारी संस्था या ग्रामीण भागात असून त्यांची सदस्य संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे.

 

राज्यातील सध्याची पूरपरिस्थिती व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार जनजीवन सुरूळीत होण्यास कालावधी लागेल. अशा स्थितीत जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीमध्ये आपला हक्क बजावता यावा, सहभाग घेता यावा यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कक मधील तरतूदीनुसार सदर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या तरतुदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात, 250 किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच, ज्याप्रकरणी सर्वोच्च / मा. उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांना हा आदेश लागू करण्यात आला आहे.  ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत त्यांच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करून निवडणुका घेण्याबाबतची कार्यवाही करावी, असे राज्याचे सहकार व पणन व वस्त्रोद्योग विभागाने 15 जुलै 2022 रोजी निर्गमीत केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

 

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची

निवडणूक पुढे ढकलली

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना म. लक्ष्मीनगर, देगाव-येळेगाव या कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यासाठी 1 ते 15 जुलै 2022 या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात आले आहेत. ही निवडणूक प्रक्रिया 15 जुलै पासून ज्या टप्प्यावर असेल त्या टप्प्यावर दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वरील शासन आदेशान्वये पुढे ढकल्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी दिली.    

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...