Friday, May 6, 2022

शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीच्या सुविधेत गैरवापर आढळल्यास दोषीवर कारवाई

 

शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीच्या सुविधेत गैरवापर

आढळल्यास दोषीवर कारवाई

 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील महा ई-सेवा केंद्र, इंटरनेट कॅफे व मोटार ड्रायव्हींग स्कुल इत्यादी संस्थाना अचानक भेट देण्यात येणार आहेत. या भेटी दरम्यान  संबंधित संस्थामध्ये ऑनलाईन सुविधांचा गैरवापर होताना आढळल्यास दोषी संस्थांवर कायद्यातील तरतूदींप्रमाणे व अर्जदारावर मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 19 (1) (इ) अन्वये कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी केले आहे.

 

केंद्रीय मोटार वाहन नियम 11 अन्वये शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहीत केलेली परीक्षा देणे अनिवार्य आहे. या मागचा प्रमुख उद्देश हा संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हांचे व वाहन चालकाच्या जबाबदाऱ्यांचे महत्व याची माहिती व जाणीव असणे आवश्यक आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होते. यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करतेवेळी पालकांनी त्यांच्या पाल्यास या परीक्षेचे महत्व पटवून देणे आवश्यक ठरते. उक्त प्रणालीचा गैरवापर होणार याची जाणीव देखील करुन देणे आवश्यक आहे.

 

परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्तीची चाचणी ऑनलाईन देण्याची प्रणाली 14 जून 2021 पासून सुरु करण्यात आली आहे. शासनाने सुरु केलेल्या शिकाऊ अनुज्ञप्ती व वाहनचालक अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी तात्काळ सेवा उपलब्ध केलेल्या धोरणाचा गैरफायदा सायबर कॅफे घेत असून तशी जाहिरात प्रसिध्द करुन गैर व्यवहार सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा जाहिरातीमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती काढण्यास आरटीओमध्ये जाण्याची व टेस्टचीही गरज नसुन फक्त फोटो व आधारकार्ड द्या आणि शिकाऊ अनुज्ञप्ती मिळवा अशा प्रकारच्या तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.

0000

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...