Friday, May 27, 2022

 प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी

86 महसूल मंडळातील शंभर गावांमध्ये होणार पीक कर्ज वाटप शिबीर  

 

·       1 जूनच्या शिबिरासाठी जिल्हा प्रशासन व बँकांची जय्यत तयारी

· पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकांच्या प्रतिनिधी मार्फत गावोगावी संपर्क   

 

नांदेड, (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून अधिकाधिक सहाय्य करता यावे यादृष्टिने प्रत्येक तालुक्यातील पात्र लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत बँकांचे प्रतिनिधी बैठका घेऊन  संपर्क साधत आहेत. जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि बँकांच्या समन्वयातून येत्या 1 जून रोजी 86 महसूल मंडळातील शंभर गावात पीक कर्ज वाटप शिबीर आयोजित केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाअंतर्गत आयोजित या उपक्रमात पीक कर्जाचे 400 कोटी तर बचतगटांसाठी 100 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले जाणार आहे.

 

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संपर्क साधून आढावा घेतला. प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत समन्वय साधून पीक कर्ज योजनेबाबत गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी 1 जूनच्या या शिबिराबाबत अधिकाधिक जागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या.  

 

23 बँकांच्या माध्यमातून येत्या 1 जून रोजी जिल्ह्यात 75 ठिकाणी पीक कर्ज वाटप शिबिराचे आयोजन पूर्वी निर्धारीत केले होते. जिल्ह्याचा विस्तार आणि महसूल मंडळांची संख्या, मोठ्या गावांची संख्या लक्षात घेऊन आता हे शिबीर शंभर गावात करण्याचे नियोजन केले आहे. यात पीक कर्जाचे 400 कोटी तर बचतगटांसाठी 100 कोटी रुपयांचे कर्ज वाटप होईल अशा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...