Friday, April 29, 2022

 आपल्या मराठवाड्याचा माणूस

कोविडसाठी देशाचे नेतृत्व करतो याचा अभिमान

-        पालकमंत्री अशोक चव्हाण

 समाजातील असमानता आणि आरोग्याच्या प्रश्नावर

नेटाने काम करण्यासाठी पुरस्कारातून प्रेरणा

-        पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर  

 

·        डॉ. शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यात सारेच भावूक     

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- मराठवाड्यातला आपला भूमिपुत्र कोरोना सारख्या आजाराच्या संशोधनासाठी, या आजारातून सर्व देशवासियांना वाचविण्यासाठी संशोधनात स्वत:ला मग्न करून घेतो, या आजाराशी लढायचे कसे, या आजारापासून सुरक्षित राहायचे कसे याचे शास्त्रोक्त व सुत्रबद्ध पद्धतीने लोकांना बळ देतो, कोरोनासह आजवर असंख्य जीव घेण्या आजारातून नव्या लसीचे संशोधन देतो, असे आपले ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री सन्मानित डॉ. रमण गंगाखेडकर यांच्याप्रती प्रत्येकाला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या जीवन गौरव पुरस्काराची त्यांच्या माध्यमातून जी भव्य सुरूवात झाली आहे, विशेषत: या निवडीने पुरस्काराचाही गौरव झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या रौप्य महोत्स सोहळ्याचे उद्घाटन व श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कुसूम सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास पुरस्काराचे मानकरी पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, उपमहापौर अब्दुल गफार अ. सत्तार, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बस्वराज पांढरे, मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, अपर्णा नेरळकर, पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती. 

महानगरपालिका 25 वर्षांचा एक टप्पा पार पाडत असतांना मला एका आठवणीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ती आठवण आजही तेवढीच ताजी आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदी तेंव्हा मनोहर जोशी होते. नांदेड वाघाळा महानगरपालिकेची घोषणा त्यांनी करून या महानगराच्या विकासाला नवे पर्व सुरू करून दिले. या विकासाच्या टप्प्यात भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरूत्ता गद्दी सोहळ्या निमित्त विविध सेवा-सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर आता पालकमंत्री म्हणून, राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून निधीसाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरला. त्यांनीही जिल्ह्याच्या विकासासाठी जी पाठराखण केली त्यामुळेच आपण पुन्हा या महानगराच्या विकासासाठी सुमारे सातशे ते आठशे कोटी रुपयांची कामे करू शकत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नांदेडकरांच्यावतीने मी आभार मानतो या शब्दात त्यांनी नांदेडच्या विकासाला अधोरेखीत केले. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पहिले नगराध्यक्ष म्हणून कारकिर्दपासून ते आजवर जो मैलाचा टप्पा आपण गाठू शकलो त्यात सर्वसामान्य लोकांचेही योगदान अधिक आहे, या  शब्दात त्यांनी नांदेडकरांचे आभार मानले.

 कोरोनाचा काळ आठवला की, आजही अंगावर शहारे येतात. पहिल्या लाटेतच मी बाधित झालो. उपचारासाठी मुंबईला जातांना लोकांच्या मनात एक धास्ती होती. अनेकांना ही भेट शेवटीचीच आहे की काय इथपर्यंत भीतीने गाठले होते. अशा काळात नांदेडचा भूमिपुत्र संपूर्ण देशाला कोरोनातून बचावासाठी दिलासा देतो, या आजाराची माहिती सांगून लोकांना धीर देतो, ही बाब अशाकाळात औषधापेक्षाही अधिक परिणामकारक होती, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगून पद्मश्री डॉ. गंगाखेडकर यांच्या कार्याला अधोरेखित केले. या काळात सगळ्यांना खूप काही सोसावे लागले. जिल्हा अधिक सुरक्षित रहावा यावर आम्ही नंतर अधिक दक्ष राहिलो. संपूर्ण जिल्हाभर कोविड बाधितांवर उपचार करण्यासाठी केंद्र उभारण्यावर आम्ही भर दिला. नांदेड महानगर हे वैद्यकीय क्षेत्रात प्रगतशील असल्याने स्वाभाविकच अप्रत्यक्षरित्या त्याचा ताण नांदेड वर आला. शेजारच्या जिल्ह्यातून रुग्ण येथे आले. अशा स्थितीत संपूर्ण जिल्हा प्रशासनची टीम, वैद्यकिय महाविद्यालय, महानगरपालिका, आरोग्य विभाग यांनी जे काम केले त्याला तोड नाही. एक जबाबदारीचे पर्व कोरेाना काळात आपण देऊ शकलो, याचा आवर्जून उल्लेख पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला.

 

नांदेड महानगरपालिका, जिल्हा प्रशासन हे वाढत्या महानगराच्या गरजा लक्षात घेऊन काम करत आहे. यात अनेक पातळीवरचे प्रश्न आहेत. नागरीकरणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासमवेत ज्या समतेचा आग्रह डॉ. रमण गंगाखेडकर यांनी घेतला आहे त्या जेंडर समानता, तृतीयपंथीयांना अधिकार आदी नाजूक प्रश्न जिल्हा प्रशासनातर्फे संयमाने हाताळल्या जात असल्याचे सांगून लोकाभिमूख प्रशासनाची त्यांनी व्याप्ती व जबाबदारी स्पष्ट केली. डॉ. रमण गंगाखेडकर हे नव्या पिढीचे प्रेरणास्थान आहेत. मराठवाड्यातील भूमिपुत्र म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान जरूर आहे. त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचले जावेत, त्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळावे यासाठी वेळोवेळी निमंत्रीत केले जाईल, असे ते म्हणाले.    

शब्द निट सापडत नाहीत. कोणी सन्मान केला की जबाबदारीमध्ये आणखी वाढ होईल याची एक नकळत धास्तीही राहते. प्रत्येकांच्या मनाशी जवळकिता साधणाऱ्या या साध्या शब्दातून ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी आपल्या साध्या जीवन शैलीसह कर्तव्य तत्पर विचारसरणीला प्रवाहित केले. डॉ. शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार स्विकारल्यानंतर ते बोलत होते. मनाच्या भावूक अवस्थेला सावरत त्यांनी उपस्थितांशी साधलेला संवाद हा प्रत्येकजण टिपून घेत होता. जिल्हा परिषद शाळा, बिलोली, धर्माबाद येथील विज्ञान महाविद्यालय, अंबेजोगाई येथील वैद्यकिय महाविद्यालय आणि औरंगाबाद येथील वैद्यकिय महाविद्यालयातील सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत हा पुरस्कार अप्रत्यक्षरित्या त्यांनी मराठवाड्याच्या ग्रामीण भागालाच अर्पण केला.    

डॉ. शंकरराव चव्हाण यांचे व्यक्तीमत्व उत्तुंग होते. त्यांची बरोबरी कोणाला करता येणार नाही. माझे वडील याच जिल्ह्यात तहसिलदार असल्याने त्यांच्या बोलण्यातून शंकररावांप्रती सदैव नम्रतापूर्वक उल्लेख असायचा. ते नेहमी म्हणायचे शंकररावांसारखी सचोटी कोणाजवळ मिळणार नाही जिल्हा परिषदेच्या शाळेतून मी चांगल्या गुणांनी एसएससी उत्तीर्ण झालो. वडील म्हणाले चल शंकररावांना भेटायला जावू” मी घाबरलो. तसाच घाबरत त्यांच्याकडे गेलो. त्यांच्यातला साधेपणा पाहून माझ्या मनातली भिती गळून पडली ते लक्षातही आले नाही. या भेटीची आठवण डॉ. रमण गंगाखेडकर यांनी आवर्जून सांगत शंकरराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

लहानपणी शिकत असतांना आपण फार काही पुढे मोठे होऊ असे काही निश्चित नव्हते. प्रामाणिकपणे शिकत राहिलो. विशेषत: शिक्षक जे काही सांगतील ते सर्व नम्रतेने ऐकत राहिलो. माझ्या जिल्हा परिषदेतील शाळेच्या शिक्षकांपासून ते पुढे वैद्यकिय महाविद्यालयापर्यंत व जिथे कुठे शिक्षणाचा संबंध येत राहिला तिथे मी गुरूजींच्या सांगण्याला प्राधान्य दिले. आज माझ्यात जे काही चांगले असेल ते गुरुजनांचे आहे. माझी सर्व मूल्य जिल्हा परिषदेच्या शाळेमुळे घडली असे निसंकोचपणे सांगत त्यांनी गुरू जर चांगले भेटले नसते तर केवळ पैशाच्या मागे लागणारा डॉक्टर झालो असतो, असेही स्पष्ट सांगायला त्यांनी कमी केले नाही.

 

वैद्यकिय क्षेत्रात कार्य करीत असतांना विविध पातळ्यांवर काम करण्याची संधी मला मिळाली. यात एड्स संदर्भात कार्य करीत असतांना सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांपासून तृतीयपंथीयापर्यंत, विविध सेक्स वर्कर्स व तळागाळातील लोकांकडून पुस्तकांच्यापलीकडे शिकायला मिळाले. एड्सला नियंत्रण हे गोळ्या औषधांसमवेत वर्तणाशी निगडीत अधिक आहे. यासाठी लोकांना अगोदर समजून घेणे महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन त्यांचेही प्रतिनिधी एड्स कंट्रोल सोसायटीवर, संस्थांवर असले पाहिजेत यासाठी धरलेल्या आग्रहाचा त्यांनी उल्लेख केला. आयुष्यात मला प्रत्येक ठिकाणी मन मोकळे करणारी माणसे मिळाली. सेवाभावी संस्थांमुळे, समाजातील या जागृत लोकांमुळे मला पद्मश्रीचा सन्मान मिळू शकला अशी वस्तुस्थिती प्रांजळपणे त्यांनी सांगितली. पुरस्कारासाठी कुठेही अर्ज करणे मला भावले नाही. एक मात्र खरे की डॉ. शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्काराने मला माझ्या पुढच्या आरोग्य क्षेत्रातील कामासाठी व समाजात जी असमानता आहे त्यावर काम करण्यास बळ मिळाले आहे, प्रेरणा मिळाली आहे असे पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. 

नांदेडच्या नगरपरिषदेपासून ते महानगरपालिकेच्या प्रवासातील विविध संदर्भांना उजाळा देणारा हा महोत्सव आहे. या महानगराच्या विकासातील कटिबद्धतेला, योगदानाला अधोरेखीत करणारा हा उत्सव आहे. डॉ. शंकरराव चव्हाण हे या नगराचे पहिले नगराध्यक्ष राहिले असून विकासाचा त्यांनी घातलेला पाया हा तेवढाच भक्कम असल्याने या शहराच्या विकासातील काळानारूप निर्माण होणाऱ्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आपल्या महानगरपालिकेत, पालकमंत्री अशोक चव्हाणा यांच्या नेतृत्वात असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री डी. पी.  सावंत यांनी केले. 

यावेळी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे महापौर पद भूषवून योगदान देणाऱ्या सर्व महानुभवांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर जयश्रीताई पावडे यांनी केले तर आभार मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी मानले.

0000000











No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...