जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना चालना देण्यासह
स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा होट्टल
महोत्सवाचा हेतू
- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
· 28 मार्च पर्यंत स्थानिक कलाकारांना अर्ज करण्याची संधी
नांदेड, (जिमाका) दि. 23 :- जो समृद्ध वारसा नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे त्याच्या जपणुकीसाठी, पिढ्यानपिढ्या ज्या कला येथे विकसीत होत आल्या आहेत त्याला व्यासपीठ मिळावे, स्थानिक प्रतिभावान कलाकारांना संधी उपलब्ध व्हावी, त्यांच्या कलेला चालना मिळावी यादृष्टिने जिल्हा प्रशासन होट्टल महोत्सवाकडे पाहते आहे. बहुप्रतिक्षेत असलेल्या होट्टल सांस्कृतिक महोत्सवाचा मूळ हेतूच जिल्ह्यातील सांस्कृतीक वैभवाला अधोरेखीत करण्याचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन संचालनालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने होट्टल सांस्कृतिक महोत्सव 2022 चे आयोजन केले जात आहे. दिनांक 9 ते 11 एप्रिल या तीन दिवसीय कालावधीत देगलूर जवळील होट्टल येथील मंदिर परिसरात हे आयोजन होणार आहे. स्थानिक कलाकारांना अधिकाधिक संधी मिळावी व महोत्सवाची पुढील रुपरेषा ठरावी याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधितांना निर्देश दिले. याचबरोबर महोत्सव काळात स्थानिक कलाकारांच्या सादरीकरणासाठी राखीव वेळही ठेवण्यात आली आहे.
ज्या स्थानिक कलाकारांना, कलाकारवृंद यांना त्यांच्याकडील अनुभव, वैशिष्ट्य व सादर करावयाच्या कार्यक्रमांच्या रूपरेषेसह दिनांक 28 मार्च 2022 पर्यंत लेखी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. हे अर्ज
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दंडाधिकारी शाखेत कार्यालयीन वेळेत स्विकारले जातील.
या अर्जावर होट्टल सांस्कृतिक महोत्सव 2022 अंतर्गत अर्ज असे
स्पष्ट नमूद केलेले व विहित कालावधीत अलेले अर्जच स्विकारले जातील, असेही जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट केले आहे.
00000
No comments:
Post a Comment