Wednesday, March 30, 2022

 1 एप्रिल पासून विनाहेल्मेट

दुचाकी स्वारांचा परवाना होईल रद्द 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- सर्व दुचाकी स्वारांनी हेल्मेट घालुनच प्रवास करावा. विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून आल्यास नागरिक, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गंत वाहन चालकास 500 रुपये दंड व अनुज्ञप्ती (लायसन्स) 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात येईल. ही मोहिम ही 1 एप्रिल 2022 पासून राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व दुचाकी वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 मध्ये नमुद केल्यानुसार कोणतेही दोन चाकी वाहन रस्त्यावर चालवितांना हेल्मेट परिधान / घालणे हे सक्तीचे आहे. वेळोवळी मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय यांनी देखील दुचाकी वाहन चालवतांना हेल्मेट घालणे हे सक्तीचे असल्याबाबत निर्णय दिलेले आहेत. वाहन चालवितांना हेल्मेट वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात असे दिसून आले आहे. 

शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणारे बहुतांशी नागरिक तसेच कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी हे विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हयातील सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या नागरिक, कर्मचारी व अधिकारी यांना विनाहेल्मेट दुचाकी वाहनावर प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे याबाबतची माहिती द्यावी असे सर्व कार्यालय प्रमुखांना परिपत्रकान्वये कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...