Friday, January 14, 2022

 कोविड बाधितांच्या मार्गदर्शनासाठी

जिल्हा प्रशासनाच्यावतीने नियंत्रण कक्ष

 

·         लसीकरणासाठी सर्व शासकीय यंत्रणा दक्ष

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- नांदेड महानगरात या आठवड्याच्या सुरुवातीलाच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गत दोन दिवसांपासून दररोज चारशेच्यावर बाधित आढळून येत असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. नागरिकांना या नियंत्रण कक्षाद्वारे योग्य मार्गदर्शन व्हावे व त्यांना आवश्यक ती उपचाराची माहिती मिळावी या उद्देशाने हा नियंत्रण कक्ष कार्यरत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. या नियंत्रण कक्षाशी गरजूंनी 02462-262626 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

 

कोविड-19 पासून दूर राहण्यासाठी मास्कसॅनिटायझर व गर्दीपासून दूर राहणे हा सर्वोत्तम उपाय आहे. नागरिकांनी याचे अधिक गांभीर्याने पालन करणे गरजेचे आहे. तथापि जे नागरिक बाधित झाले आहेत अथवा ज्यांना कोविड-19 ची लक्षणे आहेत त्यांनी 02462-262626 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपल्या शंकेचे निरसन करता येईल. याचबरोबर कोविड-19 प्रादुर्भावाच्या औषधांची माहितीआवश्यक असलेल्या वर्तणाबाबतची नियमावली तसेच कोविड बाधितांचे समुपदेशन या केंद्रामार्फत केले जात आहे. जे नागरिक विलगीकरणामध्ये आहेत त्यांना योग्य तो सल्ला देण्यासाठी नियंत्रण कक्षात कुशल स्वयंसेवक यांची नियुक्ती केली असून गरजू नागरिकांनी अधिक भांबावून न जाता 02462-262626 या क्रमांकावर संपर्क साधावा असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

 

जिल्ह्यात अधिकाधिक प्रमाणात लसीकरण व्हावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे स्वत: प्रत्येक गावनिहाय आढावा घेत असून सर्व यंत्रणांचा समन्वय साधून प्रत्येक विभाग प्रमुखांना यात दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत.  

0000000    

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...