Wednesday, November 17, 2021

रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज करण्याचे आवाहन

 

रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज करण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 17 :- शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या धरणामध्ये उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता चालू रब्बी हंगाम सन 2021-22 मध्ये 15 नोव्हेंबर 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत अटीच्या अधीन राहून नमुना नंबर 7,7() वर पाणी अर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. ज्या लाभधारकांना रब्बी हंगामात नमुना नं. 7 वर भूसार पिके, चारा पिके इत्यादी पिकांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी आपले नमुना नंबर 7,7,() चे पाणी अर्ज जवळच्या शाखा कार्यालयात 30 नोव्हेंबर पर्यत आवश्यक त्या कागदपत्रासह भरुन द्यावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता एन.पी. गव्हाणे  यांनी केले आहे.

यासाठी पुढीलप्रमाणे अटी आहेत.

शासनाच्या प्रचलित धोरणानुसार प्राधान्याने शक्यतो चारा पिके व भुसार पिके करावीत. पाणी अर्जासोबत वहिवाटीचा सातबारा उतारा जोडावा. पाणी नाश टाळण्यासाठी लाभाधारकांनी शेतचाऱ्या दुरुस्त करुन घ्याव्यात पाटमोट संबंध नसावा. शंकररावजी चव्हाण प्रकल्पावर उपसा सिंचनास मंजुरी असणाऱ्या संस्था/वैयक्तीक बागाईतदार यांनी त्यांचे नमुना नं. 7 चे पाणी अर्ज सादर करावेत. थकबाकीदार बागायतदार यांना त्यांचेकडील थकबाकीची संपुर्ण रक्कम भरल्यानंतरच त्यांना मंजुरी दिली जाईल. कोणत्याही परिस्थितीत थकबाकीदाराना पाणी दिले जाणार नाही. धरणातील पाण्याचा साठा, कालव्याची व फाटयाची वहन क्षमता, वहन कालावधी यांचा विचार करुन मागणी क्षेत्रास मंजुरी देताना क्षेत्रात कपात केली जाईल. उडाफ्याचे क्षेत्रास मंजुरी दिली जाणार नाही. पाणी मागणी अर्ज न देता पिके केल्यास या पिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची राहणार नाही. पाणी न मिळाल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यास संबंधित लाभधारक जबाबदार राहतील. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ठरेल त्या नियोजनाप्रमाणे पाणी पुरवठा केला जाईल. त्यानंतर पाणी न मिळाल्याने पिकांचे कोणत्याही प्रकाराने नुकसान झाल्यास, त्यास  जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही. वरीलप्रमाणे करण्यात येणारा पाणीपुरवठयास शासकीय आदेश लागू राहतील असे पाटबंधारे विभागाकडून कळविण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...