Tuesday, November 16, 2021

धार्मिक व प्रार्थना स्थळांना ज्येष्ठ नागरिक व गर्भवती महिलांना प्रवेशास मुभा

 

धार्मिक व प्रार्थना स्थळांना

ज्येष्ठ नागरिक व गर्भवती महिलांना

प्रवेशास मुभा

ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हादंडाधिकारी यांचे अटी व शर्तीनुसार आदेश निर्गमित

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  कोविड-19 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपायांसह धार्मिक आणि प्रार्थनास्थळे याठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी प्रवेश देण्याबाबत ब्रेक द चेन अंतर्गत मुभा देण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी याबाबत आदेश निर्गमित केले.

 

साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 मधील तरतुदी व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदी अन्वये जेष्ठ नागरीक व गरोदर महिलांना यापुर्वी प्रवेशास बंदी होती. आता नवीन आदेशान्वये ज्यांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या मात्रेनंतर 14 दिवस पूर्ण झालेले आहेत. अशा 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक व गरोदर महिलांना सुध्दा धार्मिक व प्रार्थना स्थळांना भेट देण्याची मुभा दिली आहे. धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या क्षेत्रात प्रवेश करताना मुख आवरण (मास्क) घालणे, शारिरीक अंतर राखणे, (थर्मलस्कॅनिंग) व हात धुणे किंवा रोगाणुरोधक यंत्र अनिवार्य आहे. याशिवाय कोविड-19 च्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाय योजनांवर प्रमाणित कार्यचालन, कार्यपध्दती शासनाच्या आदेशातील अटी व शर्ती लागू राहतील.

 

या आदेशाचे पालन न करणारे नागरीक भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहतील. आदेशाचे काटेकोर अंमलबजावनी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसे नागरी भागात संबंधित आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत मुख्याधिकारी यांची राहील. या सर्व प्रक्रीयेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांची राहील. हे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 16 नोव्हेंबर रोजी निर्गमित केले आहेत.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...