Thursday, November 11, 2021

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गंत किनवट येथे शासकीय योजनाचा महामेळावा

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गंत

किनवट येथे शासकीय योजनाचा महामेळावा

कायदेविषयक साक्षरतेवरही विशेष भर

नांदेड (जिमाका) दि. 11 :-  तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या आदिवासी किनवट तालुक्यात आझादी का अमृत महोत्सवांतर्गंत वैशिष्टपूर्ण कायदेविषयक साक्षरतेचा जागर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 4 या कालावधीमध्ये मांडवी येथे लोकाभिमूख ठरणाऱ्या या उपक्रमात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना तिथल्या तिथेच लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला आहे. या महामेळाव्याचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत ल. आणेकर,  जिल्हाधिकारी विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर (घुगे), जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किर्तीकुमार पुजार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र एस. रोटे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर किनवट शंकर अंभोरे, सहदिवाणी न्यायाधीश विजय परवारे, तालुका दंडाधिकारी मृणाल जाधव व जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रमूख उपस्थित राहणार आहेत.

 

गत दोन वर्षात कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इतर तालुक्यासह किनवट तालुक्यातील आदिवासी बांधवानीही आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळून आरोग्याची काळजी घेतली. तथापि या कालावधीत निर्माण झालेली इतर वैद्यकीय अडचणी, प्रशासकीय पातळीवर करावयाची कामे यांचा विचार करुन हा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. अनेक शासकीय योजना या कायदेविषयक जबाबदारीशी सुसंगत असल्याने योजनासह कायदेविषयक साक्षरतेला चालना मिळावी यादृष्टीने जिल्हा सेवा प्राधिकरणाच्या वतीने 2 ऑक्टोंबर पासून विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ही चळवळ राबविली जात असून मांडवी येथे या महामेळाव्याच्या माध्यमातून आदिवासी बांधवापर्यत विविध योजना या पोहचविल्या जात आहेत.

 

या महामेळाव्यात 75 स्टॉलमध्ये आरोग्य सेवेसह आरटीओ कार्यालय, पोलीस विभाग, महसूल विभाग आदि संबंधित विभागाशी कुणाचे निगडित प्रश्न असतील तर तेही मार्गी लावण्याचे नियोजन केले आहे. याचबरोबर वैद्यकीय तपासणी,  कोवीडचे लसीकरण, रक्तदान शिबीरही आयोजीत करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेतर्गत असणारे शिक्षण, आरोग्य, कृषि, पशुधन विकास, बाल विकास प्रकल्प, पाणी पुरवठा व बांधकाम विभाग, आदिवासी विकास, भूमि अभिलेख,  बचतगट ग्राहक सल्ला आदी विविध प्रकारचे स्टॉल्स यात असतील. मांडवी परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र एस. रोटे यांनी केले आहे.

00000

 

 

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...