Tuesday, October 12, 2021

अपघातातील हिरकणीना सावरण्यासाठी जेंव्हा जिल्हा प्रशासन धावून जाते

 

अपघातातील हिरकणीना सावरण्यासाठी जेंव्हा

जिल्हा प्रशासन धावून जाते

 

नांदेड, (जिमाका) 12 :- नवरात्र उत्सवानिमित्त रोजच्या सारखी आजची सकाळही तशीच भारलेली होती. नांदेडहून माहुरकडे जाणाऱ्या रस्त्याला नकळत एक भक्तीचा संदर्भही तेवढाच प्रसन्नता देणारा होता. आज या राष्ट्रीय महामार्गावरुन सातारा येथून निघालेल्या हिरकणींचा एक गट दुचाकी वाहनावरुन माहुरगडाकडे निघाला होता. तुळजापूरचे दर्शन करुन नऊ महिला व तीन पुरुष असे बारा सदस्य असलेला गट दिनांक 11 ऑक्टोबर रोजीच रात्रीला नांदेडच्या मुक्कामाला होता. मुक्काम करुन हा गट राष्ट्रीय महामार्गाने भोकर मार्गे माहुरकडे आज सकाळी 8.00 ला नांदेड येथून रवाना झाला.

 

महिलांच्या आरोग्याची काळजी व विशेषत: ब्रेस्ट कॅन्सर व रस्ते सुरक्षितता याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा हे ध्येय घेऊन या हिरकणी निघाल्या होत्या. सकाळी नऊच्या सुमारास हा महिला हिरकणी रायडर्सचा गट नांदेड अर्धापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भोकर फाट्याजवळ पोहोचला. येथील शिवाजी महाराज चौकात यातील एक हिरकणी मोठ्या कंटेनरच्या अपघातात बळी पडली. क्षणाचाही विलंब न करता स्थानिक प्रशासन यांनी धावपळ करुन इतर हिरकणींना धीर देऊन या आघातातून सावरण्यासाठी बळ दिले.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना ही माहिती अपघात झाल्याच्या काही क्षणांतच दुरध्वनीद्वारे कळाली. त्यांनी तात्काळ तालुका दंडाधिकारी किरण अंबेकर यांना सूचना देऊन आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आदेश दिले. ज्यांच्यासमोर अपघात झाला त्यातील आठ हिरकणी व इतर सदस्यांना एका विशेष वाहनातून नांदेड येथे आणण्यात आले. त्यांच्या मदतीसाठी महिला नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांना दिवसभर व्यवस्था होईपर्यंत मदतीसाठी ठेवण्यात आले.

 

अपघातासंदर्भात अत्यावश्यक असलेली सर्व कायदेशीर प्रक्रिया व यात बळी पडलेल्या हिरकणी शुभांगी संभाजी पवार हिचे शवविच्छेदन व कायदेशीर बाबी पुर्ण करुन जिल्हा प्रशासनाने विशेष अँम्बुलंसद्वारे हे पार्थिव साताऱ्याला रवाना केले. याचबरोबर गटात असलेल्या इतर हिकरणींना धीर देऊन एका विशेष वाहनाने या दुखात सहभागी होत त्यांनाही विशेष वाहनाने आज सायंकाळी पाच वाजता रवाना केले. त्यांची दुचाकी वाहने इतर वाहनाद्वारे पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनतर्फे व्यवस्था केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

या अपघाताने आम्ही सुन्न पडलो आहोत. जवळची एक हिरकणी आम्ही गमावली आहे. अपघात झाल्याबरोबर जिल्हा प्रशासन ज्या तत्परतेने धावून आले म्हणून आम्हाला सावरता आले अन्यथा आमचे सारेच अवघड होते. अशी भावून प्रतिक्रीया या गटातील मोना निकम हिने दिली. मोना निकम या सातारा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत.

000000

No comments:

Post a Comment

 यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात आज माळेगावच्या यात्रेला प्रारंभ   आज देवस्वारी व पालखी पूजन  नांदेड दि. २८ डिसेंबर : उद्या 29 डिसेंबर रोजी...