Monday, September 6, 2021

 सुधारित वृत्त

नांदेड जिल्ह्यातील लोकाभिमुख उपक्रमाचा 

मापदंड म्हणून "मिशन आपुलकी" ओळखली जाईल

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांची व्यापक बैठक 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- नांदेड जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या जेवढा व्यापक आहे तेवढाच तो गुणवत्तेनेही समृद्ध आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सेवेमध्ये नांदेड जिल्ह्यातील भूमिपुत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकजण भारतीय प्रशासकीय सेवेत आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या गावाप्रती ओढ असून गावासाठी काही तरी करण्याची भावना शेतकऱ्यांपासून सर्वांची आहे. या सर्वांच्या श्रद्धा व भावनांना व्यापक कर्तव्याच्या पूर्तीत रुपांतरीत करता यावे यासाठी "मिशन आपुलकी" हा उपक्रम अत्यंत मोलाचा आहे. सर्वांच्या सहभागाचे प्रतीक म्हणून "मिशन आपुलकी" च्या नावाने नांदेड जिल्हा नवा मापदंड निर्माण करेल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. 

या उपक्रमासंदर्भात जिल्ह्यातील ग्रामसेवक-कृषिसेवक-तलाठी यांच्यापासून तालुका ते जिल्हा पातळीवरील सर्व प्रमुखांच्या आयोजित करण्यात आलेल्या व्यापक बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, जिल्हा कोषागार अधिकारी अभय चौधरी, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील आदी उपस्थित होते. तर सर्व तालुकापातळीवरुन संबंधित उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि ग्रामपातळीवरील तलाठी, कृषि सेवक, ग्रामसेवक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे सहभाग घेतला.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना आपल्या गावाप्रती प्रत्येकांच्या मनात कृतज्ञता आणि उत्तरदायीत्त्वाची भावना ही मोलाची आहे. प्रत्येकाने आपल्यापरीने गावातील शाळेसाठी, अंगणवाडीसाठी अथवा पशुधनाच्या निमित्ताने काही योगदान दिल्यास त्या-त्या सेवासुविधा अधिक भक्कम होतील. यातून आपल्या कर्तव्यपूर्तीची भावना आणि त्यातील समाधान प्रत्येकाला घेता येईल असे सांगून त्यांनी "मिशन आपुलकी" या उपक्रमाला अधिक भक्कम करण्याचे आवाहन केले. 

प्रत्येक गावातील सामान्यातील सामान्य माणसापासून कोणालाही यात आपला सहभाग घेता येईल. यातून आपल्या गावाला खऱ्या अर्थाने लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या कर्तव्य प्रधान गावात रुपांतरीत करता येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. 

नांदेड जिल्ह्यात सुमारे 9 हजारापेक्षा अधिक शिक्षक आहेत. 20 ते 25 हजार पेक्षा जास्त मनुष्यबळ हे विविध विभाग आणि कार्यालयाशी संबंधित आहे. यातील बहुतांश वर्ग हा नांदेड जिल्ह्यातीलच असल्याने प्रत्येकाने आपल्या गावासाठी पुढे येऊन मदत करणे हे अपेक्षित आहे. यात प्रत्येकाचा सहभाग तळमळीने आल्यास परस्पर विश्वासर्हतेच्या माध्यमातून गावाला विकासाच्या प्रवाहात सहज आणता येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. 

कृषि सेवक, तलाठी, ग्रामसेवक ही प्रत्येक गावाच्या विकासासाठी बांधिल असलेली शासनाच्या त्रीसुत्रीतील प्रमुख घटक आहेत. या त्रीसुत्रीनी आपली जबाबदारी व कर्तव्य निष्ठेने पार पाडून गावातील लोकांचाही विश्वास संपादन केल्यास "मिशन अपुलकी" मार्फत विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले जाऊ शकतील, असेही त्या म्हणाल्या. 

प्रत्येक विभागातील गावात नेमके काय करता येऊ शकेल याचा आराखडा येत्या काही दिवसात तयार करुन त्याबाबत कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या बैठकीत दिले. "मिशन आपुलकी"ची माहिती जिल्ह्यातील सर्वांना व्हावी या उद्देशाने मंगळवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायं. 6 वा. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे फेसबुक लाईव्ह ठेवण्यात आले आहे. 

00000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...