Thursday, July 22, 2021

 

गर्भपात औषध अवैध विक्री प्रकरणी गुन्हा नोंद

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- गर्भपाताचे औषध ए-कारे किट यांची अवैधरित्या विक्री केल्या प्रकरणी मे. मेट्रो फार्मा नांदेड या दुकानाचे मालक श्रीमती मालती दिपक भोरगे रजि. फार्मासिस्ट प्रकाश सुदाम लोखंडे व डी.के.टी. इंडीया या कंपनीचे वैद्यकीय प्रतिनिधी बुध्दानंद थोरात, मयुर लोले व मयुर वेलापुरे यांचे विरुध्द भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे अन्न व औषध प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई 2 जुलै 2021 रोजी अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक मा. ज. निमसे यांनी सहाय्यक आयुक्त औषधे रा. शं. राठोड, सहा आयुक्त औषधे औरंगाबाद संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

 

मे. मेट्रो फार्मा नांदेड या घाऊक औषध विक्री दुकानाची तपासणी केली असताना दुकानदाराने  ए-कारे किट या गर्भपाताचे औषधाची मोठया प्रमाणावर खरेदी विक्री केल्याचे दिसून आले. दुकानदाराने यवतमाळ, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, पुणे, सातारा या जिल्ह्यातील डॉक्टर व औषध विक्रेत्यांना औषधाचा पुरवठा केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त औषधे यांना डॉक्टराकडे पुढील चौकशी करुन अहवाल देण्याची विनंती करण्यात आली. त्यात मे. मेट्रो फार्मा नांदेड यांनी प्रशासनाला सादर केलेली गर्भपाताच्या औषधाच्या विक्री बिले खोटी व बोगस आढळून आले असून डॉक्टरांना औषधी पुरवठा झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

मे. मेट्रो फार्मा नांदेड यांचे  चौकशीत त्यांनी डी.के.टी.इंडीया कंपनीचे वैद्यकीय प्रतिनिधी बुध्दानंद थोरात, मयुर लोले व मयुर वेलापुरे यांचे सांगण्यावरुन औषधी परजिल्ह्यात पाठविल्याचे आढळून आले. मे. मेट्रो फार्माचे मालक श्रीमती मालती दिपक भोरगे व रजि. फार्मासिस्ट प्रकाश सुदाम लोखंडे यांनी डी.के.टी इंडीया कंपनीचे वैद्यकीय प्रतिनिधी बुध्दानंद थोरात, मयुर लोले व मयुर वेलापूरे यांच्याशी संगनमत करुन ए-कारे किट या गर्भपाताचे औषधाची विक्री अवैधरित्या काळया बाजारात गर्भपात करणेसाठी केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे विरुध्द भा. दं.वि. कलम 34, 177,336,420,468, 471 व औषधे व सौंदय प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 चे नियम 65 (5), 65(9) () नुसार भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा क्र. 247/2021 दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीसामार्फत सुरु आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (औषधे) यांनी दिली आहे.

*****

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...