Wednesday, June 2, 2021

 सारथी संस्थेच्या मुख्यालय इमारतीसाठी

पुणे शहरात शिवाजीनगर भाबुर्डा येथे जागा

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे या संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत  महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात प्रामुख्याने संस्थेच्या मुख्यालय इमारतीसाठी पुणे शहरातील शिवाजीनगर भाबुर्डामधील सी.स.नं. 173/1 ब मधील 4163 चौ.मीटर जमीन मुख्य रस्त्यालगत मिळाली. याचबरोबर संस्थेसाठी 41 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्टाफ शासनाने 4 मे रोजी मंजूर केला. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष अभिनंदनाचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली आहे. सारथी संचालक मंडळाची सभा 1 मे रोजी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षीत गटांच्या प्रगतीसाठी निर्णय घेण्यात आले.  

 

या बैठकीतील निर्णयात सारथी संस्थेमार्फत एम.फील / पीचडीसाठी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF-2020) मुलाखतीस सर्व उपस्थित एकूण 207 विद्यार्थ्यांची निवड करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. तसेच 34 अनुपस्थित उमेदवारांना मुलाखतीस एक अधिकची संधी देण्याचे ठरले.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र सेवा गट-ब (अराजपत्रित) सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्री कर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी दरवर्षी अंदाजे 500 रिक्त जागा घोषित होतात. यासाठी सारथी, पुणे मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) साठी संयुक्त (पुर्व)  (मुख्य) परीक्षांसाठी लक्षित गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून सर्व पात्र अर्जदारांना ऑनलाईन नि:शुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच केंद्रीय कर्मचारी निवड आयोगामार्फत अराजपत्रित (गट ब गट क) पदांसाठी सन 2020-21 मध्ये अंदाजे 20 हजार रिक्त पदे जाहीर झाली. यासाठी सारथी पुणे मार्फत केंद्रीय कर्मचारी निवड आयोगामार्फत अराजपत्रित (गट ब व गट क) पदांच्या परीक्षापूर्व तयारीसाठी लक्षित गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून सर्व पात्र अर्जदाराना ऑनलाईन नि:शुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेद्वारे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची निवड केली जाते. या परीक्षा दरवर्षी आयोजित होतात. यासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश परीक्षेद्वारे (CET) लक्षित गटातील 250 उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेसाठी सन 2020 मध्ये 74 रिक्त पदे जाहीर करण्यात आली. यासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश परीक्षेद्वारे (CET) लक्षित गटातील एकूण 400 उमेदवारांना मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

 

सारथी पुणे मार्फत प्रायोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा कोचिंग तुकडी 2019-20 मधील एमपीएससी पूर्व परीक्षा 2020 उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी कोचिंग व हजेरीवर आधारित तीन महिन्याचे विद्यावेतन एकूण 24 हजार रुपये अथवा एकरकमी आर्थिक सहाय्य 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी कोणताही  एक आर्थिक लाभाचा पर्याय विद्यार्थी स्वत:च्या निवडीनुसार निवड करु शकतात.

 

सारथी संस्थेसाठी घोषवाक्य स्पर्धा भरविण्यात आली होती. त्यात 948 जणांनी सहभाग नोंदविला यामध्ये 26 एप्रिल 2021 पर्यंत ई-मेलद्वारे सादर करण्याची मुदत होती. हे घोषवाक्य पूर्ण मराठीत असणे व जास्तीत जास्त 7 शब्दापर्यंत असणे अनिवार्य होते. मागविण्यात आलेल्या घोषवाक्यांपैकी संचालक मंडळाने "शाहू विचारांना देवूया गती, साधुया सर्वांगीण प्रगती" या घोषवाक्याची निवड केली. हे घोषवाक्य जगदीश विष्णु दळवी यांनी पाठविले होते. त्यामूळे स्पर्धेच्या निकषानुसार सारथी संस्थेतर्फे त्यांना 10 हजार रुपयाचा धनादेश देण्यात येणार आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...