Monday, May 17, 2021

 

महात्‍मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत

कार्य करण्‍यास इच्‍छुक स्‍वयंसेवी संस्‍थांनी 31 मे पर्यंत अर्ज करावेत

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :-  ज्‍या स्‍वयंसेवी संस्‍था जिल्‍हास्‍तरावर किंवा तालुकास्‍तरावर प्रशिक्षण, संवाद, श्रमदान, नियोजनात सहयोग, सामाजिक अंकेक्षण, गुणवत्‍ता मोजमापाच्‍या कामात सहकार्य करण्‍यास इच्‍छुक आहेत. त्या स्वयंसेवी संस्थेने कार्यालयीन वेळेत सोमवार 31 मे 2021 पर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयात समक्ष अथवा टपालाने आवश्‍यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्‍त होणाऱ्या अर्जांचा विचार करण्‍यात येणार नाही. तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्‍या संस्‍थांनी देखील आवश्‍यक कागदपत्रांसह नव्‍याने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा मग्रारोहयोचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे मृद व जलसंधारण, वृक्ष संगोपन, सांडपाणी व घनकचरा व्‍यवस्थापन वैयक्‍तीक लाभाच्‍या योजना व अभिसरण व मुलभूत सुविधांचा विकास अंतर्गत कामे केली जातात.  योजनेच्‍या कामाची अंमलबजावणी करताना अशासकीय संस्‍थांची व इतर सेवाभावी संस्‍थांची मदत घेतल्यास योजना प्रभावीपणे राबवून लोकांचे जीवनमान उंचावणे शक्‍य होईल. योजनेमध्‍ये सीएसओ, एफपीओ, सीबीओ, एनजीओची अ‍खर्चित भागीदारी साठी स्‍वयंसेवी संस्‍थांचा सहभाग घेण्‍याबाबत निर्णय घेण्‍यात आला आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्‍याचे अनुषंगाने मगाराग्रारोहयोची सहयोगी संस्‍था म्‍हणून स्‍वयंसेवी संस्‍थांची निवड करण्‍यात येणार आहे.

 

स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या निवडीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. विना आर्थिक सहाय्याचे काम करण्‍याची तयारी असावी. शासकीय क्षेत्रात काम करण्‍याचा अनुभव असावा. जलसंधारण किंवा सामुदायिक विकासाचे नियोजन क्षेत्रात काम करण्‍याचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्‍य देण्‍यात येईल. अशा स्‍वयंसेवी संस्‍थांचे प्रशासकीय संघटन आवश्‍यक त्‍या जिल्‍ह्यात, तालुक्‍यात असावे. सदर स्‍वयंसेवी संस्‍था निती आयोगाच्‍या एनजीओ पीएस पोर्टलवर नोंदणीकृत असावी. अर्ज सादर केलेल्‍या पात्र स्‍वयंसेवी संस्‍थांची ज्‍या भौगोलिक क्षेत्रात आणि ज्‍या कार्यक्षेत्रात काम करण्‍यास तयारी असेल, त्‍यांचे कामाचा अनुभव आणि गुणवत्‍ता पाहता त्‍याकरीता काम करण्‍यास रितसर परवानगी देण्‍यात येईल. हे कार्य विनामुल्‍य करावयाचे असून कामाचा कोणताही मोबदला अनुज्ञेय असणार नाही. अधिक माहितीसाठी नियोजन विभाग (रोहयो) शासन परिपत्रक क्रमांक मग्रारो-2020/प्र.क्र.97/रोहयो-10अ दिनांक 13 जानेवारी 2021 चे अवलोकन करावे असेही कळविले आहे.  

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...