Wednesday, April 28, 2021

सिटीस्कॅनचा स्कोअर बरोबर पंचवीसवर आत्मविश्वास व डॉक्टराचे प्रयत्नातून 65 वर्षाचा वयोवृध्द कोरोनातून बाहेर

                                सिटीस्कॅनचा स्कोअर बरोबर पंचवीसवर

आत्मविश्वास व डॉक्टराचे प्रयत्नातून 65 वर्षाचा वयोवृध्द कोरोनातून बाहेर

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- लोहा तालुक्यातील जोमेगाव या लहानश्या गावातील सुमारे 65 वर्षाचे कोंडजी शिंदे हे शेतकरी. भौतिक सुविधा व आजच्या जगात हाती असलेल्या मोबाईलपासून कोसोदूर.  उगवत्या सुर्याला नमस्कार घालायचा आणि शेतीच्या कामात स्वत:ला दिवसभर झोकून द्यायचे असा या बाबाचा शिरस्ता. पंधरा दिवसापूर्वी  त्यांना त्रास व्हायला लागला. तपासण्या झाल्या. सिटीस्कॅनचा स्कोअर थेट पंचवीसवर.जवळच्या नातलगांनी त्यांना उचलून नांदेड येथील जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील कोविड रुग्णालयात दाखल केले. वय आणि सिटीस्कॅनचा स्कोअर हे सारेच अधिक असल्याने उपचार करणारे डॉक्टर सुरवातीला चिंतेत होते.

 

एक आव्हान म्हणून जिल्हा रुग्णालयातील टिमने त्यांच्यावर उपचार सुरु केले. एरव्ही श्वास घ्यायला जिथे बाबांना त्रास होत होता तो हळूहळू काही दिवसांत फुलायला लागला. कोविड रुग्णालयातील त्यांच्या आजूबाजूचे सारे रुग्ण बाबांचा स्कोअर ऐकून जीथे धास्तीत होते, तेवढेच हे बाबा निर्धास्त होते. मोबाईलपासून कोसोदूर, बाह्य जगात काय चालू आहे यांच्या फारश्या भानगडीत न पडता डॉक्टर जे काही सांगतात ते श्रध्दा ठेवनू ऐकायचे आणि कोणतेही प्रश्न न विचारता दिलेल्या गोळया घ्यायच्या या बाबाच्या स्वभावामूळे उपचार करणाऱ्या टिमलाही त्यांचे विशेष अप्रुप झाले.  

 

चौदा दिवसांचा कालावधी या  बाबाला खूप मोठा झाला. दोन दिवसापूर्वीच त्यांचे ऑक्सीजन जेव्हा काढले  तेव्हा हे बाबा आता मला घरी जावू द्या म्हणून डॉक्टराच्या मागे लागले. डॉक्टरांनी त्यांना बळजबरी दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवून सर्व खातरजमा झाल्यानंतर आज ‍रुग्णालयातून सूट्टी देण्याचा निर्णय घेतला. आजवरच्या कोविड उपचारात जिल्हा रुग्णालयातील ही सर्वोच्य सिटीस्कॅनची स्कोअर असलेली केस यशस्वी झाल्याने इतर रुग्णांचे आणि वैद्यकीय टिमचे मनोबल वाढावे, त्यांच्या अथक प्रयत्नांना शाबासकी द्यावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांची भेट घेवून त्यांना रुग्णालयातून शुभेच्छासह निरोप दिला. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालक अधिकारी तथा विभागीय उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सिरसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंडे आदी यावेळी उपस्थित होते.

00000

 

   

No comments:

Post a Comment

​   वृत्त क्र. 1138 ​ वेगळी निवडणूक ! यंत्रणेवर विश्वास वाढविणाऱ्या घटनांनी लक्षवेधी ठरली   25 वर्षानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी नांद...