Saturday, February 13, 2021

 

नांदेडच्या शैक्षणिक शिरपेचात

आता तीन अध्यासनांची भर

पालकमंत्री अशोक चव्हाण व उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

यांच्याकडून शैक्षणिक विस्ताराचा आढावा   

नांदेड (जिमाका) 13 :- मराठवाड्याच्या एका टोकावर असलेल्या नांदेड जिल्ह्यासह लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या नव्या वाटा मिळाव्यात यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात आता लवकरच भा.प्र.से. पूर्व प्रशिक्षण केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुल हे लवकरच आता विद्यापीठ परिसरात साकारल्या जाणार आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथील शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोणातून सांगोपांग चर्चाअंती हा निर्णय घेतला. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विविध शैक्षणिक विकास आणि नांदेड येथील शैक्षणिक क्षेत्राच्या विकासाबाबत आज श्री गुरुगोविंद सिंघजी आभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ, संचालक डॉ. यशवंत जोशी आणि विभाग प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत विद्यापीठ व स्वायत्त दर्जा लाभलेल्या श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेअंतर्गत विविध शैक्षणिक विकास कामांचा आढावा घेण्यात आला. 

नांदेड येथील शासकिय अध्यापक महाविद्यालयाच्या इमारत बांधकामास मान्यतेसह नांदेड येथील शासकिय तंत्रनिकेतची 1 हजार 272 चौ.मीटरची जागा ईबीसी वसतीगृहासाठी हस्तांतरणाच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली. या बैठकीत श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेअंतर्गत प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करुन त्यात मार्ग काढण्यात आला. यात प्रामुख्याने व्यवस्थापन मंडळाच्या अधिकारातील कामांना चालना देणे, शिक्षकीय संवर्गातील रिक्त पदे यावर चर्चा करण्यात आली. महाविद्यालयीन स्तरावर निर्णय घेता यावेत व दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडले जावे यादृष्टिने व्यवस्थापन मंडळाची लवकरच नेमणुकीबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करण्यात आले. संस्थेचे संचालक डॉ. वाय. व्ही. जोशी यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले.

0000







No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...