Sunday, January 24, 2021

 

धर्माबाद व उमरी तालुक्यातील

विकास योजनांसाठी माझी भावनिक कटिबद्धता

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

 ग्रामपंचायतींना विविध विकासाच्या प्रक्रियेत घेऊ  

नांदेड (जिमाका) दि. 24 :- धर्माबादच्या विकासासाठी आजवर जी काही प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात आली त्यात मला प्रत्यक्ष सहभाग घेता आला याचे मनोमन समाधान आहे. बाभळी बंधाऱ्यापासून ते या भागातील युवकांना चांगल्या शिक्षणासह क्रीडा क्षेत्रातही नैपुण्य प्राप्त होण्यासाठी विविध विकास योजनांबाबत मी निश्चय केला होता. येथील क्रीडा संकुलनाच्या प्रत्यक्ष उभारणीनंतर त्याचे उद्घाटन करतांना व याचबरोबर धर्माबाद येथील 170 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज होत असल्याने आजचा हा दिवस माझ्यासाठी खऱ्या अर्थाने हा वचनपूर्तीचा दिवस असल्याचे भावनिक उद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काढले.     

धर्माबाद येथील तालुका क्रीडा संकुल, शहर बाह्यवळण रस्ता, रेल्वे उड्डाण पूल व भूयारी पूलाचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, निवासी मुलींच्या वसतीगृहाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यासर्व विकास कामांच्या शुभारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन समारंभात पालकमंत्री अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, विधान परिषदेचे प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार राजेश पवार, माजी आमदार वसंत चव्हाण, उपाध्यक्षा पद्मा रेड्डी, गोविंदराव शिंदे नागेलीकर, हरीहरराव भोसीकर, उमेश मुंडे, जि.प.चे सभापती संजय बेळगे, नगराध्यक्षा अफजल बेगम यांची उपस्थिती होती. 

धर्माबादच्या विकासाचा ध्यास व स्व. शंकरराव चव्हाण यांनी धर्माबादवासियांप्रती जपलेली तळमळ मी विसरु शकत नाही. बाभळी बंधाऱ्या पासून, इथल्या कृषि क्षेत्राच्या विकासासाठी, धर्माबाद तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा विडा मी उचला असून शासनस्तरावर ज्या काही योजना शक्य आहेत त्या सर्व योजना येथे आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

मध्यंतरी येथील काही अल्पगावांनी तेलंगणात जाण्याचा विचार केला होता. याची आठवण करुन देत त्यांनी बाभळीच्या पाणी प्रश्नांप्रती महाराष्ट्राने न्याय लढा देऊन हा बंधारा पूर्ण करुन शेतकऱ्यांना पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करुन दिले असल्याचे सांगितले. बाभळी बंधाऱ्यात पाणी रोखून धरले नाही तर ते सरळ कोणाच्याही उपयोगी न पडता वाहून जाते. तेलंगणाच्याही फायदाचे ते पाणी राहत नाही. हे लक्षात घेऊन धर्माबाद तालुक्यातील, नायगाव तालुक्यातील व गोदाकाठच्या परिसरातील गावांना, शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा यादृष्टिने महाविकास आघाडीचे शासन सत्तेवर येताच आम्ही पुन्हा प्रयत्न सुरु केले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: तीनवेळेस तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत कल्पना दिली आहे. शिवाय स्वतंत्र लेखी पत्रव्यवहारही केलेला आहे. एवढी दक्षता व काळजी धर्माबाद तालुक्यातील तेलंगणाच्या काठावर उभे असलेल्या महाराष्ट्रातील गावांप्रती आणि गावातील नागरिकांप्रती महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधूनही जर एवढा पाठपुरावा तेलंगणाशी करावा लागत असेल तर या गावातील लोकांना तेलंगणा शासन उभे कसे करेल असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध असून प्रत्येक ग्रामपंचायतीला जे काही शक्य असेल ते देण्याचा प्रयत्न करु असेही त्यांनी स्पष्ट केले. 

हे वर्षे कोरोनामुळे आव्हानात्मक होते याची सर्वांनाच कल्पना आहे, असे असूनही रेल्वे उड्डाणपूल, भुयारी रेल्वेपूल अशा 170 कोटी रुपयांच्या कामासह एशिएन डेव्हलमेंट बँकेअंतर्गत नांदेड ते निळा-आसनापूल-मुगट-अंदुरगा-कारेगावफाटा ते बासर येथील ट्रीपल आयटीपर्यंत जवळपास शंभर कोटीचा रस्ता लवकरच हाती घेऊन याचे भूमीपूजन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करु, असेही त्यांनी सांगितले. या मार्गामुळे धर्माबाद येथून नांदेडपर्यंत अवघ्या 1 तासात व पुढे नांदेड येथून जोडल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पांतर्गत अडीच तासात नांदेड येथून औरंगाबादला पोहचता येईल. या नवीन मार्गामुळे नांदेड जिल्ह्यातील कृषि क्षेत्राच्या उत्पादन वाहतुकीसाठी नवी उपलब्धी होऊन शेतकऱ्यांनाही अधिक सुकर होईल, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. या समारंभात आमदार अमर राजूरकर व इतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. धर्माबाद येथील विविध युवक संघटनांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे भव्य स्वागत केले. 

धर्माबाद येथील विविध विकास कामांच्या शुभारंभानंतर उमरी शहरातील 115 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. यात हदगाव-तामसा-भोकर-उमरी-कारेगाव-लोहगाव रस्ता व रेल्वे उड्डाणपूल, उमरी शहरालगत बाह्यवळण रस्ता याचा समावेश आहे.  

000000







No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...