Tuesday, December 1, 2020

 

कोविडचे मोठया प्रमाणातील रुग्ण लक्षात घेता

महापरिनिर्वाण दिन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा  

-जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन

नांदेड (जिमाका) 1  :-नांदेड शहर व जिल्ह्यामध्ये अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. आजवर जिल्ह्यातील बाधितांची संख्या व बरे होवून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या विचारात घेता स्थिती आटोक्यात जरी असली, तरी या संसर्गजन्य आजाराचा धोका टळलेला नाही. सदर वस्तुस्थिती लक्षात घेता भारतरत्न                      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. कोरोनाच्या स्थितीमुळे गत आठ महिन्यात सर्व धार्मिक सण व उत्सव जिल्हावासियांनी अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्र न येता साजरे करुन सार्वजनिक आरोग्याला अधिक महत्व दिले असल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही जिल्हाधिकारी यांनी केला .

शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधित कायदा, 1897 दिनांक 13 मार्चपासून लागू केला आहे. यात खंड दोन, तीन, चार मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. याचबरोबर केंद्र शासनाने टप्प्या-टप्प्याने लागू केलेले लॉकडाऊन 31 डिसेंबर, 2020 पर्यंत लागू करण्यात आले आहे. सदर परिस्थितीचा विचार करता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासन परिपत्रकान्वये मार्गदर्शक सुचना जिल्हादंडाधिकारी यांच्या मान्यतेने विहीत केल्या आहेत. त्या सुचना पुढीलप्रमाणे आहेत.

 

1.      नांदेड शहरात व जिल्‍ह्यामध्‍ये अद्यापही कोरोनाचे रूग्‍ण मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत. चालू वर्षी कोविड या संसर्गजन्‍य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्‍यात आलेले सर्व धर्मीय सण/उत्‍सव अत्‍यंत साध्‍या पध्‍दतीने व लोकांनी एकत्रीत न येता साजरे केले आहेत. त्‍यामुळे या वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा दिनांक 6 डिसेंबर, 2020 रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविडच्‍या पार्श्‍वभुमीवर पुर्ण खबरदारी घेऊन अत्‍यंत साध्‍या पदधतीने पार पाडण्‍यात यावा. 

2.      कोवीड विषाणूच्‍या पार्श्‍वभुमीवर चैत्‍यभुमी, दादर येथे जाण्‍यावर निर्बंध असल्‍याने व दादर तसेच महाराष्‍ट्रातील अन्‍य रेल्‍वे स्‍थानकांवरही गर्दी करण्‍यास निर्बंध असल्‍याने शासनातर्फे महापरिनिर्वाण दिना निमित्‍त चैत्‍यभुमी, दादर येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरून थेट प्रेक्षपण करण्‍यात येणार असल्‍याने सर्व अनुयायांनी चैत्‍यभुमी दादर येथे न जाता घरातुनच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.  

3.      महापरिनिर्वाण दिन हा दिवस भारतीयांसाठी दुःखाचा, गांभिर्याने पालन करावयाचा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विषयी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याचा दिवस आहे. त्‍यामुळे कोविड संसर्गचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी विचारपुर्वक व धैर्याने वागावे. तसेच घरी राहूनच परमपुज्‍य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. जेणे करून काविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्‍यास मदत होईल.                                           

4.    महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त परमपुज्‍य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्‍याचा कार्यक्रम हा संपूर्ण नांदेड जिल्‍ह्यात आयोजित करण्‍यात येत असल्‍याने गर्दीवर नियंत्रण राहण्‍याच्‍या अनुषंगाने या पुर्वी शासनाच्‍या निर्देशानुसार प्रतिबंधीत केल्‍या प्रमाणे जमावावर / गर्दीवर निर्बंध राहतील याची संबंधीतानी नोंद घ्‍यावी.     

5.     कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्‍थानिक प्रशासन यांनी वेळो‍वेळी विहित केलेल्‍या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्‍यक्ष महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम सुरू होण्‍याच्‍या मधल्‍या कालावधीत काही सूचना नव्‍याने प्रसिध्‍द झाल्‍यास त्‍यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील. 

            या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...