Thursday, November 26, 2020

 

देगलूर येथे बारा तंबाखू

विक्रेत्यांवर कार्यवाही  

नांदेड (जिमाका) 26 :- जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने देगलूर येथे अचानक धाडी टाकून 12 तंबाखू विक्रेत्यांकडून 15 हजार 600 रुपये दंड आकारला आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास व कोरोना संक्रमनास प्रतिबंध करण्यास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

या कार्यवाहीची माहिती मिळताच शहरातील अनेक पानटपरीधारकांनी पळ काढला. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. 

सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्यास अथवा धुम्रपान केल्यास कोरोना संक्रमनाचा धोका वाढतो. देगलूर शहर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या पथकात नोडल अधिकारी डॉ. पाटील, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथील डॉ. मो. उस्मान तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. आर. जकीकोरे व पो.कॉ. बी. जी. पांचाळ आदी होते.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...