Thursday, October 15, 2020

 खाजगी दवाखाण्यात उपचार घेणाऱ्या कोविड बाधितांना

रेमडिसेव्हीर इंजेक्शन 2360 रुपयांना असेल उपलब्ध    

नांदेड (जिमाका) दि. 15 :-कोविड-19 बाधित रुग्णांच्या उपचारासाठी रेमडिसेव्हीर शंभर मिली ग्रॅम हे इंजेक्शन वापरले जाते. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये हे इंजेक्शन कोविड बाधितांसाठी मोफत उपलब्ध आहे. परंतू खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या बाधितांना हे औषध मिळत नसल्याच्या व मिळाले तरी महाग दराने मिळत असल्याच्या असंख्य तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने यासाठी निश्चित दर ठरवून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते कोणत्या ठिकाणी उपलब्ध असेल त्या मेडिकल स्टोअर्सचे नाव जाहिर केले आहेत. यानुसार आता खाजगी दवाखाण्यामध्ये उपचार घेत असलेल्या कोणत्याही कोविड-19 बाधितांना या इंजेक्शनची प्रतिक्षा करावी लागणार नाही. हे इंजेक्शन आता अल्पदरात म्हणजेच रुपये 2360 या किंमतीत असेल,  असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व जिल्हा शल्यचिकित्सकांना लेखी कळविले आहे. 

या इंजेक्शनबाबत जिल्हा प्रशासनातर्फे दक्षता घेतली जात असून शासनाने निर्धारीत केलेल्या दरानुसारच ते गरजूंना दिले जाईल याबाबत खबरदारी घेतली जात आहे. निर्धारीत केलेल्या किंमतीत गरजू कोविड बाधितांना इंजेक्शन मिळावे यासाठी नियमावली ठरविण्यात आली आहे. ज्या खाजगी दवाखाण्यात बाधित उपचार घेत आहेत त्याला या इंजेक्शनची आवश्यकता भासल्यास संबंधित खासगी हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी बाधिताची माहिती दिलेल्या नमुन्यात भरुन ते पत्र जिल्हा शल्यचिकित्सकाच्या मंजुरीसाठी पाठविले जाईल. जिल्हा शल्यचिकित्सक कोविड बाधिताची स्थिती लक्षात घेऊन निर्धारीत दरामध्ये इंजेक्शन घेता यावे यादृष्टिने बाधिताच्या नातलगाला तसेच पत्र देईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त रोहित राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   

प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक हे जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयाकडून आलेली मागणी लक्षात घेऊन या इंजेक्शनची दैनिक गरज निश्चित करतील. याबाबत संचालक आरोग्य सेवा पुणे यांना कळविले जाईल. यावर संचालक हे जिल्ह्यातील रुग्ण संख्येनुसार प्रत्येक जिल्ह्याचा कोटा अन्न व औषध प्रशासन हे ठरवून देतील. नांदेड जिल्ह्यात हे इंजेक्शन मे. श्रीनाथ मेडिकल ॲड जनरल स्टोअर्स, श्रीनगररोड, वर्कशॉप कॉर्नर नांदेड येथे आणि प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र विष्णुपूरी नांदेड येथे उपलब्ध असेल.

****----****

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...