Thursday, September 10, 2020

 वृत्त क्र. 861    

जिल्ह्यात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

 नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

नांदेड (जिमाका) दि. 10 :-  मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यात विजेच्या गडगडाटासह दिनांक 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या काळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केली आहे. हवामानाचा हा अंदाज लक्षात घेता नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्व कल्पना असल्यास बाहेर जाणे नागरिकांनी टाळावे. मोकळ्या जागेत जर कोणी असेल आणि आसपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा असरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसणे हे सुरक्षित ठरेल. विजा चमकत असतील तर घरातील विद्युत उपकरणे त्वरीत बंद कराव्यात. ताराचे कुंपन, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तुपासून दूर राहणे अधिक हितकारक राहिल. 

आकाशात विजांचा गडगडाट अथवा चमकत असल्यास मोबाईल फोनचा वापर टाळा. लॅडलाईन फोनचाही वापर करणे टाळले पाहिजे. शावर खाली अंघोळ न करता कसल्याही विद्युत उपकरणाचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबुमध्ये अथवा शेडमध्ये आसरा घेणे टाळावे. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे न राहू नये. आपण जर घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून विज पडतांना पाहू नये.

नागरिकांनी धोक्याची शक्यता लक्षात घेऊन अधिक दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...