Sunday, September 20, 2020

जायकवाडी प्रकल्पाचे पाणी विष्णुपुरीत पोहचल्याने

प्रकल्पाच्या नऊ दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग चालू  

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

नांदेड (जिमाका) दि. 20 :-  जायकवाडी प्रकल्पाचे पाणी विष्णुपुरी प्रकल्पात पोहचले असून 9 दरवाज्यातून 1 लाख 5 हजार 200 क्युसेक्सने विसर्ग चालू आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्प व उर्ध्व मानार प्रकल्पही शंभर टक्के भरले असल्याने त्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस / अतिवृष्टी झाल्यास पाणी नदीत सोडण्यात येईल. गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे. वेळोवेळी नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गाची माहिती जलसंपदा विभागाच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी क्र. 02462-263870 वर मिळू शकेल, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता स. को. सब्बीनवार यांनी केले आहे. 

नदीमधून येणारा येवा जास्त असला तरी विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियंत्रीत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरु असून विसर्ग नियंत्रीत केला जाईल. सध्या जुन्या पुलावर पाणीपातळी 347.52 मीटर एवढी आहे. इशारा पातळी 351 तर धोका पातळी 354 मीटर इतकी आहे. इशारा पातळीचा विसर्ग 2 लाख 13 हजार क्युसेक्स व धोका पातळीचा विसर्ग 3 लाख 9 हजार 774 क्युसेक्स आहे. 

शुक्रवार 18 सप्टेंबर 2020 पासून पर्जन्यमानात घट झाल्यामुळे जायकवाडी प्रकल्पातून रविवार 20 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून सोडण्यात येत असलेला विसर्ग कमी करुन 66 हजार 100 क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. निम्म दुधना प्रकल्पातून 7 हजार 190 क्युसेक्स विसर्ग पुर्णा नदीत सोडण्यात येत आहे. तसेच माजलगाव या मोठ्या प्रकल्पातून शनिवार 19 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 11 वा. 42 हजार 700 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. सध्या 3 हजार 890 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. पुर्णा प्रकल्पाच्या (येलदरी व सिद्धेश्वर) पाणलोट क्षेत्रातून पुर्णा नदीत 32 हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला मिळते. त्याचा एकुण विसर्ग 1 लाख 47 हजार 990 क्युसेक्स एवढा आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास विसर्गात वाढ होऊ शकते. सद्य:स्थितीत नांदेड शहरात पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. तर नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणसुद्धा 100 टक्के भरले असून तेथून 1 लाख क्युसेक्स विसर्ग चालू आहे. पोचमपाड प्रकल्प शंभर टक्के भरला असल्याने गोदावरी नदीत फुगवटा निर्माण होतो. असेही नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता स. को. सब्बीनवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000


No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...