Wednesday, September 30, 2020

 

 माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत

बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना  

-         मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात माझे कुटूंब माझी जबाबदारी हे अभियान सुरु असून कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांच्या गटव्यवस्थापक यांच्यामार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनजागृती व लोकसहभागाला चालना द्यावी. ही जनजागृती करताना मास्कचा  वापर, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे या त्रिसुत्रीचा प्रभावीपणे वापर करावा. कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचा संदेश देतांना प्रत्यक्ष कृतीतून जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले.

जिल्हा आरोग्य विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषदेत कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, महिला आर्थिक विकास महामंडळ विभागाचे तीस प्रभाग व्यवस्थापकांची उपस्थिती होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत बचतगटाच्या व्यवस्थापकांनी  ग्रामीण भागात माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत कार्यक्रम घ्यावेत. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत नागरीकांना सविस्तर माहिती द्यावी. गृहभेटीद्वारे आरोग्य व आहाराबाबत जनजागृती करावी असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी म्हणाले, ग्रामीण भागात माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत जनजागृती करतांना त्यांच्या बोली भाषेत करावी. कोरोना सारख्या या संकटात आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना रुजवून त्रीसुत्रीचा वापर करण्यावर भर द्यावा असेही त्यांनी सांगितले.    

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार यांनी माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेबद्दल उपस्थितांना विस्तृत माहिती दिली. नाविण्यपुर्ण योजनेअंतर्गत होम आयसोलेशन किट तयार केली आहे असेही सांगितले. यावेळी सर्वांना मास्क, सॅनिटायझर देण्यात आले. यावेळेस प्रश्नमंजुषा कार्यक्रम झाला. शेवटी जिल्हा समन्वयक श्री. राठोड यांनी आभार मानले.

00000





No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1158 नीती आयोगाच्या मूल्यांकनात #किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर ...