Sunday, September 27, 2020

अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले

त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारलाही साकडे घालू

-         कृषि मंत्री दादाजी भुसे

 

नांदेड (जिमाका) दि. 27:-  मागील दोन दिवसांपासून मी अतिवृष्टी झालेल्या व ज्या-ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत आहे. परभणी, हिंगोली नंतर आता नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. मी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशीही संवाद साधतो आहे. या नुकसानीतून सावरण्यासाठी शासनस्तरावर आम्ही प्रयत्नशील असून ही सर्व परिस्थिती केंद्र सरकारच्याही निदर्शनास आणून देत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले. नांदेड तालुक्यातील कासारखेडा या गावातील शिवारांची त्यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   

 

पूरभाजी तुकाराम शिंदे या शेतकऱ्याने कृषि मंत्र्यांचे लक्ष वेधून झालेल्या नुकसानीची माहिती दिली. त्यांनी व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी लावलेले सोयाबिन हातचे गेले आहे. शिंदे व इतर शेतकऱ्यांना कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी धीर देत जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल याबाबत दक्षता घेण्याचे आदेश कृषि विभागाला दिले.

 

परभणी,‍ हिंगोली आणि आता नांदेड येथील अतिवृष्टीच्या भागात मी पाहणी करत असून लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सर्व जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. शासनस्तरावरुन याबाबत आम्ही योग्य तो विचार करत असून केंद्र सरकारला लवकरच याबाबत आहे ती वस्तुस्थिती मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु असेही त्यांनी स्पष्ट केले.

00000

 





No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...