Monday, June 8, 2020

वृत्त क्र. 518


लग्नसमारंभास 50 व्यक्तींची जबाबदारी
मंगल कार्यालयासह आयोजकांचीही
नांदेड (जिमाका) दि. 8 :- लग्न समारंभाच्या आयोजनासाठी शनिवार 7 जून रोजी निर्गमित केलेल्या आदेशात अधिक स्पष्टता करण्यात आली असून आदेशातील अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी ही मंगल कार्यालय मालकासह लग्न समारंभ आयोजित करणाऱ्या आयोजकांवर देखील राहील. या मर्यादेची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज निर्गमित केले आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंगलकार्यालयांवरील घातलेले निर्बंध शासनाने आता शिथिल केले असून 50 व्यक्तींना नियम व अटींच्या अधीन राहून लग्नसमारंभासाठी मुभा देण्यात आली आहे. एकावेळेस लग्न समारंभाच्या ठिकाणी मंगल कार्यालयात कर्मचारी व लग्नासाठी उपस्थित सर्व व्यक्तींची संख्या ही 50 पेक्षा जास्त असणार नाही. कोणताही आजारी व्यक्ती लग्न समारंभाला येणार नाही यासह आदेशातील अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालयाचे परवाने रद्द करुन कारवाई करण्यात येईल. लग्न समारंभासाठी लोकांची गैरसोय व कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निश्चित केलेले नियम व अटीचे उल्लंघन होणार नाहीत याची दक्षता घेऊन नांदेड जिल्ह्यातील मंगल कार्यालयांना मुभा देण्यात आली आहे. 
वरील सर्व संबंधीत यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकांचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा इंसिडंट कमांडर (Incident Commander) यांच्याकडे सादर करावीत. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा इंसिडंट कमांडर (Incident Commander)  यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्या अनुषंगाने संनियंत्रणांची जबाबदारी असेल. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे. 
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...