Sunday, May 24, 2020


खते, बी-बियाणे खरेदीची दुकानदाराकडून पावती घ्या
कृषि विभागाचे आवाहन  
नांदेड दि. 24 :- खरीप हंगामासाठी खते, बि-बियाणे, कीटकनाशके खरेदी केल्यानंतर संबंधित दुकानदाराकडून संपूर्ण विवरणासह बिल पावती घ्यावी, असे आवाहन धर्माबाद येथील तालूका कृषि अधिकारी माधुरी उदावंत व  पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्वास अधापूरे यांनी केले आहे.
शेतकरी अत्यंत कष्टाने शेती पिकवत असतो. अशावेळी खते, बि-बियाणे, कीटकनाशके, मशागत आदी कामासाठी त्याला आर्थिक गुंतवणूकही करावी लागते. त्यामुळे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने गुणवत्ता व चांगल्या दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कृषी निविष्ठा विक्रेत्याकडूनच खरेदी करावी, भेसळीची शंका दूर करण्यासाठी सीलबंद, वेष्टनातील, लेबल असलेले बियाणे खरेदी करावे, वैध मुदतीची खात्री करावी, पिशवीवर नमूद एमआरपी दरापेक्षा जास्त दराने खरेदी करू नये. खरेदी केलेल्या बियाण्याचे पीक, वाण, लॉट नंबर, वजन, बियाणे ज्या कंपनीचे आहे ते नाव, किमान किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, विक्रेत्याचे नाव व सही असलेली रोख अथवा उधारीची पावती घ्यावी. ही पावती तसेच वेष्टन बॅग, त्यावरील लेबल व त्यातील थोडे बियाणे या गोष्टी पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवाव्यात. काही शंका असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...