Thursday, April 2, 2020


बँकेत नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी
जनधन योजनेच्या खात्यातील रक्कम खात्यातून
वाटतांना कार्यप्रणालीचा अवलंब करण्याचे  
जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश
नांदेड, दि. 2 :-  प्रधानमंत्री जनधन योजनेतील महिला खातेदारांच्‍या खात्‍यात जमा करण्‍यात आलेली रक्‍कम खात्‍यामधून वाटप करतांना बॅंक व बॅंक ग्राहक सेवा केंद्रात नागरीकांची गर्दी टाळण्‍यासाठी दिलेल्या कार्यप्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशाद्वारे  सर्व संबंधित यंत्रणा व बँकांना दिले आहेत.  
साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 मधील तरतुदीनुसार संदर्भात नमुद अधिसुचना 14 मार्च 2020  मध्‍ये जिल्हादंडाधिकारी यांना सदर प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपायोजना करणे आवश्‍यक आहे, त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून घोषित केले आहे.
त्यानुसार जिल्‍हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपायोजनेचा एक भाग म्‍हणून रक्‍कम काढण्‍यासाठी खातेदारांची बॅंकेत व बॅंकेच्‍या ग्राहक सेवा केंद्रावर एकाच वेळेस गर्दी होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे वित्‍तीय सेवा विभाग वित्‍त मंत्रालय भारत सरकार यांनी सर्व बॅंकाना दिलेले निर्देश 1 एप्रिल 2020 अन्‍वये सदर रक्‍कम वाटप करतांना पुढील प्रमाणे कार्यप्रणालीचा अवलंब करावा, असे निर्देश दिले आहेत.
शुक्रवार 3 एप्रिल 2020 पहिला दिवस :- असे खातेदार ज्‍यांच्‍या खाते क्रमांकाचा शेवट शून्‍य (0) किंवा 1 ने होतो अशांना सदर रक्‍कम काढता येईल. शनिवार 4 एप्रिल 2020 दुसरा दिवस :- असे खातेदार ज्‍यांच्‍या खाते क्रमांकाचा शेवट 2 किंवा 3 ने होतो अशांना सदर रक्‍कम काढता येईल. रविवार 5 एप्रिल 2020 व सोमवार 6 एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुट्टी. मंगळवार 7 एप्रिल 2020 तिसरा दिवस —असे खातेदार ज्‍यांच्‍या खाते क्रमांकाचा शेवट 4 किंवा 5 ने होतो अशांना सदर रक्‍कम काढता येईल. बुधवार  8 एप्रिल 2020 चौथा दिवस—असे खातेदार ज्‍यांच्‍या खाते क्रमांकाचा शेवट 6 किंवा 7 ने होतो अशांना सदर रक्‍कम काढता येईल. गुरुवार 9 एप्रिल 2020 पाचवा दिवस—असे खातेदार ज्‍यांच्‍या खाते क्रमांकाचा शेवट 8 किंवा 9 ने होतो अशांना सदर रक्‍कम काढता येईल.
ज्‍यांना या कालावधीत पैसे काढता आली नाहीत, अशा महिला खातेदारांना 9 एप्रिल 2020 नंतर त्‍यांना कधीही त्‍यांच्‍या खात्‍यातून पैसे काढता येणार. वित्‍तीय सेवा विभाग, वित्‍त मंत्रालय, भारत सरकार यांनी सर्व बॅंकाना दिलेले निर्देश दिनांक 1 एप्रिल 2020 मधील परिच्‍छेद 4 मध्‍ये नमुद केल्‍यानुसार वरील वेळापत्रकाबाबत सर्व संबंधित बॅंकानी लाभधारकांना, ग्राहकांना विहित केलेला मजकुर एसएमएस पाठवून अवगत करावे.  त्‍याचप्रमाणे मनरेगा अंतर्गत व प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी अंतर्गत येणारे अनुदानाच्‍या बाबतीत वेळोवेळी शासनाकडून प्राप्‍त होणाऱ्या निर्देशानुसार कळविण्‍यात येईल.
सर्व बॅंका त्‍यांच्‍या नियमित वेळेनुसार चालू राहतील. जिल्‍हयातील बॅंकाअंतर्गत सुरु असलेले सर्व ग्राहक सेवा केंद्र सकाळी 7 ते रात्री 9 या कालावधीत कमीतकमी 8 तास चालू राहतील, याची खातरजमा संबंधित नियंत्रण अधिकारी यांनी करावी. सर्व बॅंक व्‍यवस्‍थापकांनी, ग्राहक सेवा केंद्र चालकांनी कोव्‍हीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी उपाययोजनाच्‍या अनुषंगाने Social Distancing व दिलेले इतर निर्देश यांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. 
हे आदेश पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील. यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश, परिपत्रके या आदेशासह अंमलात राहतील. या आदेशाचे उल्‍लंघन करणाऱ्या कोणत्‍याही व्‍यक्‍ती, समूह यांच्याविरुध्‍द आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 अन्‍वये व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्‍यात येईल.
        या कामात कोणत्‍याही अधिकारी, कर्मचारी यांच्‍याकडून कुचराई, दिरंगाई  केल्‍याचे निदर्शनास आल्‍यास त्‍यांचे विरुध्‍द महाराष्‍ट्र कोव्‍हीड -19 उपायोजना नियम 2020 मधील तरतुद व आपत्‍ती व्‍यवस्‍थापना अधिनियम 2005 च्‍या कलम 51 व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाई करण्‍यात येईल, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...