Tuesday, December 31, 2019


औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक
पदवीधर मतदारांची अंतिम यादी जाहीर
औरंगाबाद दि. 30- (विमाका) :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची अंतिम यादी  आज जाहीर करण्यात आली आहे.  प्रारुप मतदार यादीतील सुधारणासह यादी  विभागीय आयुक्त कार्यालयाचे https://Aurangabad.gov.in/commissioner-office/ या  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, उप-विभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय येथे दि. 30 डिसेंबर 2019 पासून पाहण्यासाठी उपलब्ध  असल्याचेही विभागीय आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.
            मतदार नोंदणी नियम 1960 अन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रम  01 ऑक्टोबर 2019 पासून सूरू झाला होता. पूर्वीच्या पदवीधर मतदार संघाच्या यादीमध्ये नाव असले, तरीही संबंधित मतदारांना मतदार नोंदणीसाठी नव्याने अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले होते. पदवीधर मतदार संघांची  निवडणुक जुलै 2020 मध्ये होणार आहेत.
00000



तहसिल इमारत परिसरात घाण
करणाऱ्या व्‍यक्‍तींवर कारवाई
               नांदेड दि. 31 :-  नांदेड तहसिल कार्यालयाच्या मध्यवर्ती प्रशासकिय इमारत परिसरात घाण करणाऱ्या व्यक्तींना तहसिलदार डॉ. अरुण जऱ्हाड यांनी स्‍वच्‍छतेचे, परिसराचे महत्‍व समजावून सांगीतले. त्यानंतर पकडलेल्‍या या लोकांना समज देऊन यापूढे घाण करणार नसल्‍याचे हमीपत्र घेण्‍याची कारवाई करुन त्‍यांना सोडण्‍यात आले.
याबाबत तहसिलदार डॉ. ज-हाड यांनी परीसरातील लोकांना आवाहन केले की, यापुढे अशा लोकांवर मुंबई पोलीस अधिनियमानूसार कारवाई करण्‍यात येणार आहे. स्‍वच्‍छतेसाठी नायब तहसिलदार व विस्‍तार अधिकारी यांचे नेतृत्‍वाखाली पथक तयार करुन स्‍वच्‍छता राखण्‍यात येणार आहे.
या इमारतीच्‍या मागील भागास मोकळी जागा असून तेथे काही पुरुष, महिला सकाळच्‍या प्रातः विधीसाठी उपयोग करीत होते त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्‍य पसरले होते. त्‍यामूळे कार्यालयीन कर्मचारी व येणारे नागरीक यांच्‍या आरोग्‍यास धोका निर्माण झाला होता.  31 डिसेंबर रोजी सकाळी 5 ते 7 या वेळेत जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे व उपविभागिय अधिकारी  लतीफ पठाण यांचे मार्गदर्शनाखाली तहसिलदार डॉ. अरुण ज-हाड, मंडळ अधिकारी अनिरुध्‍द जोंधळे ,तलाठी उमाकांत भांगे, आकाश कांबळे, वाहनचालक जहीद व कोतवाल बालाजी सोनटक्‍के यांच्या मदतीने मध्‍यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात 8 व्‍यक्‍तीवर कारवाई केली. या व्‍यक्‍तींना गुरुव्‍दारा पोलीस चौकीतील कर्मचारी एम. एस. आवरतीरक व इतर दोन कर्मचाऱ्यांचे सहाय्याने ताब्‍यात घेवून पोलीस चौकीत नेले होते.             
0000


ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत
मुखेड, कंधार, लोहा तालुकास्तरीय आढावा बैठक
नांदेड दि. 31 :- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत समाविष्ट असलेल्या मुखेड, कंधार, लोहा या तालुक्यातील संबंधित गावांच्या गाव विकास आराखडामध्ये नमूद केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी 7 जानेवारी 2020 लोहा, 8 जानेवारी 2020 कंधार, 9 जानेवारी 2020 मुखेड रोजी आढावा बैठकीचे आयोजन तहसील कार्यालयाच्‍या बैठक कक्षामध्ये दुपारी 12 वाजता करण्यात आले आहे. या बैठकीस संबंधित सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना यांनी अद्ययावत व परिपूर्ण माहितीसह  उपस्थित रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या आहेत.
या आढावा बैठकीमध्ये लोहा- वाळकेवाडी टेळकी पारडी कारेगाव बामणी कंधार- मोहिजा, हनुमंत वाडी, हटक्याळ, राम नाईक तांडामुखेड- हंगरगा-पक, तांदळी, रावणकोळा, फूटकळवाडी, बेनाळ, सावरमाळ या गावातील कृषी विषयक योजना, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, रेशीम शेती, सहकार व पणन, आरोग्य, शिक्षण, रोजगार विषयक कार्यक्रम, मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरी व पांदन रस्ता कामे, महिला बचत गटाची संबंधित योजना, शाळा अंगणवाडी डिजिटल करणे, अपूर्ण घरकुलांची कामे, गावांतर्गत रस्ते, कौशल्य विकास कार्यक्रम, पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, ग्रामपंचायत इमारत, तांडा वस्ती अंतर्गत कामे, स्मशानभूमी शेड उभारणे, नाला खोलीकरण, अंगणवाडी बांधकाम, राजस्व अभियान, वृक्षारोपण व जैव संसाधन, याबाबतचा आढावा घेण्यात येणार असल्याचे नोडल अधिकारी सुपेकर यांनी सांगितले आहे.
 बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, एकात्मिक बालविकास अधिकारी, वनपरिक्षेत्राधिकारी, संबंधित सर्व ग्रामसेवक व ग्राम परिवर्तक उपस्थित राहणार आहेत.
दिनांक 27 डिसेंबर 2019 रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीस गैरहजर असलेल्या संबंधित ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
00000



जिल्हा नियोजन समितीवरील
व तीच्या सहाय्यकारी कार्यकारी समितीवरील
विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्त्या पुढील आदेशापर्यंत रद्द
नांदेड दि. 31 :- जिल्हा नियोजन समितीवरील व तीच्या सहाय्यकारी कार्यकारी समितीवरील विशेष निमंत्रित सदस्य यांच्या नियुक्त्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा नांदेड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अरुण डोंगरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) (सुधारणा) अधिनियम 2000 मधील कलम 3 चा पोटकलम (3) (चार) (फ) च्या तरतुदीनुसार जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या व सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या 15 व्यक्तींची नियोजन विभागाच्या शासन निर्णय 6 मार्च 2019 अन्वये नांदेड जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित म्हणून पुढील आदेशापर्यंत नियुक्ती करण्यात आली होती.
तसेच महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (सभा घेणे) (सुधारणा) नियम 2018 मधील नियम परिच्छेद 7 (मुळ अधिनियमाचा नियम 6-अ) नुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीला सहाय्य करणाऱ्या कार्यकारी समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियोजन विभागाचा शासन निर्णय 16 जानेवारी 2019 अन्वये पुढील आदेशार्यंत नियुक्ती करण्यात आली होती.
 परिच्छेद अ. क्र. 1 व 2 प्रमाणे करण्यात आलेल्या नियुक्त्या नियोजन विभागाचा शासन निर्णय 20 डिसेंबर 2019 अन्वये पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत, असेही जिल्हा नियोजन समिती नांदेड यांच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000



ऊस वाहतूक चालकांचे शिबिर संपन्न
नांदेड दि. 31 :- अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगाव-येळेगा येथे नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्हयातील सर्व साखर कारखान्यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी प्रबोधन शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
            या कार्यशाळेसहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव, मोटार वाहन निरिक्षक भारत गायकवाड, सहा.मोटार वाहन निरिक्षक अनिल टिळेकर तसेच भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, कार्यकारी संचालक एस.आर.पाटील, जनसंपर्क अधिकारी शिवाजीराव धर्माधिकारी, शेतक अधिकारी मनोज गाडेगावकर ऊस पुरवठा अधिकारी आर. टी. हारकळ यांची उपस्थित होत. नांदेड जिल्हयातील सुमारे 200 ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांनी कार्यशाळेचा लाभ घेला आहे.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांनी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उपस्थित असलेल्या ऊस वाहतूक करणा-या वाहन चालकांना सुरक्षित वाहतूकीबाबत माहिती त्याबाबत पाळावयाच्या दक्षता, कर्तव्य जबाबदाऱ्याची माहिती दिली. या शिबिरामध्ये उपस्थित मान्यवरांनी रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने उपस्थित ऊस वाहतूक करणा-या वाहन चालकांना सुरक्षित वाहतूकीबाबत माहिती दिली.
मोटार वाहन निरिक्षक भारत गायकवाड यांनी या शिबिराचे प्रस्ताविक आभार मानले.  यावेळी ऊस वाहतूक करणा-या वाहनांना रिफलेक्टर लावण्यात आले ऊस वाहतूक करणा-या वाहन चालकांना माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले.
00000




 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...