Tuesday, September 24, 2019


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक
विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमीत      
नांदेड, दि. 24 :- भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची दिनांक 21 सप्टेंबर 2019 रोजी घोषणा केली असून घोषणेच्‍या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्‍ह्यात विधानसभेच्‍या सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून नांदेडचे जिल्‍हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये अधिकाराचा वापर करुन विविध बाबींवर निर्बंध आदेश 21 सप्टेंबर 2019 रोजी निर्गमीत केले आहेत.  
ध्‍वनीक्षेपक, ध्‍वनिवर्धकाचा वापर  
कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर सक्षम प्रधिकाऱ्याच्‍या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरत्‍या वाहनांवर ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिर्धकाचा वापर करता येणार नाही. महाराष्‍ट्र शासन पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्रमांक ध्‍वनीप्र 2009/प्र.क्र.12/08/ता.क.1, दिनांक 31 जुलै, 2013 नुसार ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर ध्‍वनि प्रदुषणाची पातळी विहित मर्यादेत राखून करावी. ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर सकाळी 6 वाजेपुर्वी आणि रात्री. 10 वाजेनंतर करता येणार नाही.
कार्यालये, विश्रामगृहे परिसरातील निर्बंध
कार्यालये, विश्रामगृहे इत्‍यादी परिसरात कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने, कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यावर निर्बंध राहतील.
शासकीय वाहनाच्‍या गैरवापरास प्रतिबंध
निवडणूकीचे कालावधीत कोणत्‍याही वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्‍त मोटारगाडया अथवा वाहने (Cars/Vehicles) वापरण्‍यास या आदेशाव्‍दारे प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.
वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलके,
झेंडे लावणे इत्‍यादी बाबीस काही प्रतिबंध
फिरत्‍या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्‍या डाव्‍या बाजुला विंड स्‍क्रीन ग्‍लासच्‍या पुढे राहणार नाही आणि तो त्‍या वाहनाच्‍या टपापासून 2 फुट उंची पेक्षा जास्‍त राहणार नाही. प्रचाराच्‍या फिरत्‍या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्‍या आसनामागे वाहनाच्‍या डाव्‍या व उजव्‍या बाजुनेच लावण्‍यात यावा. इतर कोणत्‍याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्‍या वाहनावर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधीत पक्षाचे जिल्‍हाध्‍यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांच्‍या वाहना व्‍यति‍रीक्‍त इतर कोणत्‍याही वाहनावर लावता येणार नाही.
निवडणूक कालावधीत विश्रामगृह वापरावरील निर्बंध
शासकीय व निवडणूकीच्‍या कामावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्‍या व्‍यतीरिक्‍त, इतर कोणत्‍याही व्‍यक्‍तीस विश्रामगृहात थांबण्‍यासाठी संबंधित खात्‍याने दिलेला अधिकृत परवाना असल्‍याशिवाय किंवा सक्षम अधिकाऱ्याच्‍या पूर्व परवानगीशिवाय जिल्‍ह्यातील शासकीय/निमशासकीय विश्रामगृहात अथवा त्‍या परिसरात प्रवेश करता येणार नाही.

सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पक्ष कार्यालय स्‍थापन करण्यास निर्बंध
निवडणूकीचे कालावधीत धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये किंवा शैक्षणिक संस्‍था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे,
चिन्‍हांचे कापडी फलके, भाषण देण्याबाबतचे निर्बंध
निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकणी पक्षांचे चित्रे, चिन्‍हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.
शासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची विरुपता करण्‍यास निर्बंध  
निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष स्‍वरुपात विरुपता करण्‍यास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.
शस्‍त्र परवानाधारकाकडील शस्‍त्रास्‍त्रे वाहून नेण्‍यावर बंदी  
निवडणूकीचे कालावधीत शासकीय कर्तव्‍य पार पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचारी, बँके सुरक्षा गार्ड यांचे व्‍यतिरिक्‍त इतर सर्व परवाना धारकास परवान्‍यातील शस्‍त्रास्‍त्रे वाहून नेण्‍यास या आदेशान्‍वये बंदी घालण्‍यात आली आहे.
वरील सर्व आदेश नांदेड जिल्‍ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अनुषंगाने विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राहद्दी पर्यंत आदेश निर्गमीत झाल्‍याचा दिनांक 21 सप्‍टेंबर पासून गुरुवार 24 ऑक्‍टोंबर 2019 रोजी मध्यरात्री पर्यंत अंमलात राहतील. 
नामनिर्देशनपत्र दाखल करताना
 अवलंब करावयाची कार्यपद्धत
निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळेस वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन मोटारगाड्या/वाहने यांचा ताफ्यात समावेश असावा. तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात पाच व्‍यक्‍ती उपस्थित राहतील या व्‍यतिरिक्‍त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्‍या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे/ वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने आणि कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक‍ प्रचार करणेस प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.
हा आदेश नांदेड जिल्‍हयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अनुषंगाने 27 सप्‍टेंबर 2019 ते 4 आक्‍टोंबर 2019 रोजी मध्यरात्री पर्यंत अंमलात राहील.
मतदान केंद्र परिसरात 144 कलम
मतदानाच्‍या दिवशी सोमवार 21 आक्‍टोंबर 2019 रोजी जिल्‍ह्यातील सर्व मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागु राहील. ज्‍या ठिकाणी मतदान होणार आहे त्‍या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्तीस प्रवेश करण्‍याकरीता सोमवार 21 आक्‍टोंबर, 2019 रोजी प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.
हा आदेश मतदानाच्‍या दिवशी सोमवार 21 ऑक्‍टोंबर 2019 रोजी मतदान सुरु झाल्‍यापासून मतदान संपेपर्यन्‍त अंमलात राहील.
मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम
नांदेड जिल्‍ह्यातील 83-किनवट, 84-हदगाव, 85-भोकर, 86-नांदेड (उत्‍तर), 87-नांदेड (दक्षिण), 88-लोहा, 89-नायगाव, 90-देगलूर, 91-मुखेड विधानसभा मतदार संघाच्‍या मुख्‍यालयी गुरुवार 24 ऑक्‍टोबर, 2019 रोजी मतमोजणी शांततेत पार पडावी आणि कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत रहावी या दृष्‍टीकोणातून मतमोजणीच्‍या दिवशी मतमोजणी केंद्रापासून 200 मिटर परिसरात सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेशास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.
हा आदेश गुरुवार 24 ऑक्‍टोबर,2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यन्‍त अंमलात राहील.
0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...