Sunday, September 8, 2019


विशेष वृत्त
वृ.वि.2418
दि.7 सप्टेंबर, 2019

105 विद्यार्थ्यांनी
साकारला बांबूचा बाप्पा!
मुंबई, दि. 7 :   बांबूपासून गणपती तयार करण्याची स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली स्थित "बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने आयोजित केली. "आपला बांबू गणपती" या  स्पर्धेत चंद्रपूरातील १५ शाळातील १०५ विद्यार्थ्यांसह शाळांमधीलशिक्षकांनीही यात सहभाग घेतला. 
विद्यार्थ्यांच्या हातातील ही कला थक्क करणारी असून  यामुळे पर्यावरण रक्षणाचे बीज त्यांच्या मनात रुजले जाईल, असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
बांबूच्या मुळापासून, टाकाऊ बांबूपासून बांबूच्या सुबक आणि सुंदर मूर्ती विद्यार्थ्यांनी घडवल्या.  त्यांनी तयार केलेल्या बांबूच्या गणेशमूर्तींनी राज्यभरातील गणेशभक्ताचे मनही जिंकून घेतले आहे.
कल्पकतेला आकाशही ठेंगणं असतं असं म्हणतात,  शाडू आणि मातीच्या मुर्तीबरोबर आता कागदाच्या लगद्याचा, भाजी, सुपारी, अशा विविध पर्यावरणस्नेही वस्तुंचा  बाप्पा आकाराला येऊ लागलाय. चंद्रपूरातल्या शालेय विद्यार्थ्यांनी तर चक्क  "बांबूपासून गणपती" तयार केला आहे.
रोजगाराच्या संधी
बांबूमध्ये रोजगाराच्या अमाप संधी दडल्या आहेत हे लक्षात घेऊन बांबूला  वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त केले आहे. बांबू विकास मंडळ स्थापन करण्यात आले आहे. बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. यात बांबू पल्पपासून वस्त्रनिर्मिती, कागद निर्मिती, बांबू चटई, बांबू हस्तकौशल्याच्या वस्तू, बांबूचे घर, गृहउपयोगी सामान, औद्योगिक उत्पादने,  बांबूपासून समई, बांबूची सायकल, बांबूपासून राख्यांची निर्मिर्ती, बांबूचा राष्ट्रध्वज  आदिंचा त्यात समावेश आहे.
बांबू उद्योगाला चालना मिळावी व त्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून टाटा ट्रस्ट आणि बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्यात सामंजस्य करार झाल्याची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
पर्यावरण संरक्षणाचा संदेश बालवयात विद्यार्थ्यांना दिला तर पुढे आयुष्यभर हा संस्कार त्यांच्या कामी येतो आणि त्यांच्याकडून पर्यावरणाचे रक्षण होते. हे लक्षात घेऊनच बांबूपासून गणपती साकारण्याची कल्पना प्रत्यक्षात आणल्याचे केंद्राचे संचालक राहूल पाटील यांनी सांगितले.
0000



No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...