Wednesday, April 17, 2019


मी मतदान करणारच....
राष्‍ट्रीय कर्तव्‍य समजून निर्भयपणे मतदान करा
-        जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांचे आवाहन
नांदेड दि. 17 :- लोकशाहीच्या राज्य कारभारामध्ये निवडणूक हा महत्वाचा घटक आहे. दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत 18 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे. तो अधिकार राष्ट्रीय कर्तव्य समजून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी या महोत्सवात सामील व्हावे आणि निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
सतराव्‍या लोकसभेसाठी आज दुसऱ्या टप्‍प्‍यात मतदान घेण्‍यात येत आहे. यात नांदेड लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून आज गुरुवार 18 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजल्‍या पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. यावेळी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजवावा, असे आवाहन त्‍यांनी केले आहे.
श्री. डोंगरे म्हणाले, आपल्‍याला लोकशाही सशक्‍त व बळकट करावयाची असेल तर आपण सर्वांनी मतदानाच्‍या या पवित्र कार्यात भाग घेतला पाहिजे. तुमचे एक मत देशाच्‍या लोकशाहीचा कणा सशक्‍त करणार आहे. एवढेच नव्‍हे तर तुमच्‍या अस्तित्‍वाचेही द्योतक ठरणार आहे. तुम्‍ही प्रमाणिकपणे केलेले मतदान भारताच्‍या भवितव्‍याचा पाया मजबुत करणार आहे. निर्भिडपणे मतदान करणे ही काळाजी गरज आहे. कल्‍याणकारी लोकशाही शासन स्‍थापनेसाठी प्रत्‍येकाने मतदान करायलाच हवे. मतदान हे जागरुक नागरिकांचे पहिले लक्षण आहे. ज्‍या देशाचा नागरिक सजग असतो तो देश जगाच्‍या नकाशावर आपले अव्‍वल स्‍थान निश्चित करतो.
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार असून आपण सर्वांनी या मतदान प्रक्रियेत सहभागी व्‍हावयाचे आहे. मतदानाच्‍या दिवशी मिळालेली सुट्टी ही इतर कारणासाठी न उपभोगता मतदानासाठीच तिचा वापर करा. आपल्‍या देशाची प्रगती ही आपण करीत असलेल्‍या मतदानावर अवलंबून आहे. त्‍यामुळे श्री. डोंगरे यांनी मतदारांना विनम्र आवाहन केले आहे की, आज गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी आपण आपल्‍या मतदान केंद्रावर जान मतदान करावे. अतिशय विचारपूर्वक मतदान यंत्रावरचे बटण दाबा. केलेल्‍या मतदानाची खात्री व्‍हीव्‍हीपॅट यंत्रावर पडताळून पहा. कोणत्‍याही दबावाला प्रलोभनाला आणि कोणत्‍याही असामाजिक तत्‍वांना बळी न पडता, निर्भिड होन मतदान करा. निर्भिडपणे मतदान हीच खरी देशभक्‍ती आहे. आपण सर्वजण निश्चितपणे लोकशाहीच्‍या या राष्‍ट्रीय महोत्‍सवात मतदान करुन लोकशाही बळकट करण्‍यासाठी योगदान दयाल, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   94 ​ राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघास सुवर्ण तर मुलाच्या संघास रौप्य पदक नांदेड दि २४ :- गेल्या तीन...