Friday, February 8, 2019


मतदानासाठी अत्याधुनिक सुविधा ;  
आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे
-         जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 8 :- प्रत्येक निवडणूक ही मतदानासाठी अत्याधुनिक सुविधा घेऊ येत आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी याबाबत सखोल माहिती घेऊन निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. 
येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पूर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, सहायक पोलीस अधिक्षक नुरुल हसन, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दिपाली मोतीयेळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केंव्हाही लागू शकते. याकाळात आयोगाने दिलेल्या निर्देशाचे योग्य पालन करुन निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, भयमुक्त, पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. निवडणूक आयोगाने दिलेली आवश्यक माहिती यंत्रणेला सोप्या शब्दात समजेल अशी दिली जाणार आहे. मतदानासाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर आता होणार असून मतदारांचे नाव तपासण्यासाठी विविध माध्यमातून सेवा दिली जाणार आहे. मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्याच्या स्ट्रॉग रुमची दुरुस्ती बांधकाम विभागाकडून करुन त्याबाबत प्रमाणपत्र घ्यावे. मागील निवडणुकांचा आढावा घेऊन लोकसभा निवडणुकीत अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सज्ज राहून काम केले पाहिजे, अशीही सूचना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिली. 
विशेष पोलीस महानिरीक्षक श्री पाटील म्हणाले, निवडणूक काळात आयोगाच्या नियंत्रणाखाली काम करतांना सर्व बाबी तपासून कराव्यात. निवडणुकीची अंमलबजावणी शेवटच्या घटकापर्यंत होण्यासाठी आयोगाने दिलेले निर्देश चांगल्या प्रकारे समजून घेणे महत्वाचे आहे. आवश्यक त्या सुविधांबाबत माहिती घेऊन व्यवस्था केल्यास निवडणूक परिस्थिती चांगली हाताळता येते. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून निवडणुका पारदर्शक चांगल्या पार पाडण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे नाव चांगले राहील असे काम सर्वांना करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक श्री जाधव यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती देऊन गुन्हेगारी वृत्ती असलेल्या लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवून कार्यवाही करावी. तसेच शस्त्र परवाना धारकांनी नियमाचे पालन करावे. याकाळात अवैध कामे होणार नाहीत याची काळजी घेऊन मतदान प्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, असे सांगितले.  
आयोगाकडून निवडणूक संदर्भात वेळोवळी आढावा घेतला जात असून मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी 20 मिनिटापेक्षा जास्त कालावधी लागणार नाही यासह मतदार जागृतीसाठी उपक्रम, आचारसंहिता पथक, मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी रॅम, मतदारांना सुविधा, टेलीकॉम कनेक्टीव्हीटी, विद्युत, पिण्याचे पाणी, फर्निचर व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था, वाहन, मतमोजणी केंद्र, निरीक्षकांसाठी सुविधा, विश्रामगृहे, हेलीपॅड, सभा मैदानाची माहिती यासह विविध विषयांवर चर्चा करुन उपाययोजनांबाबत संबंधितांना निर्देश व जबाबदारी देण्यात आली.  
प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती मोतियेळे यांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध कामांबाबत माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड या नऊ विधानसभा मतदारसंघातील व्यवस्थेबाबत माहिती संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी पोलीस, महसूल अधिकारी यांचेसह संबंधीत विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
0000000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...