Thursday, February 28, 2019


नाव नोंदणीसाठी 2 व 3 मार्च 2019 रोजी
   विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन   
           नांदेड दि. 28 :- आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्‍या अनुषंगाने वंचित न राहो कोणी मतदार या उद्दीष्‍टाखाली जिल्‍हयातील सर्व पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट करण्‍यासाठी नागरीकांनी 3 व 4 मार्च 2019 रोजी आपल्‍या भागातील मतदान केंद्रावर जाऊन संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी बीएलओ यांचेकडे आपले नाव नोंदणी अर्ज भरुन द्यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी  तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण  डोंगरे  यांनी केले आहे.
               भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. सर्व मतदारांनी या अंतिम मतदार यादीत आपले नाव असल्‍याची खात्री https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्‍थळ अथवा जिल्‍हास्‍तरावर स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या मतदार मदत केंद्राचा टोल फ्री क्रमांक 1950 यावर संपर्क साधुन करता येईल. तसेच संबंधित तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जिल्‍हा निवडणूक अधिकारी कार्यालयास भेट देऊन करता येईल.
          आगामी लोकसभा निवडणूक 2019 विचारात घेऊन मतदार नोंदणीपासुन वंचित राहीलेल्‍या नागरीकांना मतदार यादीत नाव नोंदणी करता यावी यासाठी नांदेड जिल्‍हयाच्‍या सर्व विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर दिनांक 23 व 24 फेब्रुवारी 2019 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्‍यात आले होते. मात्र तरीही ज्‍यांनी अद्याप नोंदणी केली नाही अशा नागरीकांसाठी मुख्‍य निवडणूक अधिकारी यांचे निर्देशानूसार पुन्‍हा एकदा दिनांक 3 व 4 मार्च 2019 रोजी  विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्‍यात येणार आहे. या विशेष मोहिमेच्‍या दिवशी मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहुन नागरीकांचे नाव नोंदणीबाबतचे अर्ज स्विकारणार आहेत. तसेच मतदार म्‍हणून नाव नोंदविणे अथवा वगळणी करणेबाबत https://www.nvsp.in/ या ऑनलाईन पोर्टलद्वारेदेखील अर्ज भरू शकतात.
                आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार दिनांक 2 व रविवार 3 मार्च 2019 रोजी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कळविले आहे.
000000


राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2018 साठी
प्रवेशिका पाठविण्यास 15 मार्चपर्यंत मुदतवाढ
नांदेड, दि. 28 :-  राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2019 असा होता. तथापि या प्रवेशिका पाठविण्यासाठी आता 15 मार्च, 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तरी या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येन सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथेही उपलब्ध आहेत.  
000000


पंडी दीनदयाल उपाध्याय रोजगार
मेळाव्या 63 उमेदवारांची प्राथमिक निवड
नांदेड दि. 28 :- सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रच्यावतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा येथील महात्मा फुले मंगल कार्यालय येथे आज आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 63 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या मेळाव्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे रमेश केंद्रे, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक उल्हास सकवान यांची प्रमुख उपस्थिती होती. आयटीआय उत्तीर्ण सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी आपल्या अंगी असलेले कौशल्य ओळखून कष्टातून स्वयंरोजगार मिळवला पाहिजे. युवकांनी इच्छा, मेहनत, आत्मविश्वासच्या जोरावर खाजगी क्षेत्रात काम करण्याचे कौशल्य दाखवून व्यक्तीमत्वाचा विकास करावा. खाजगी उद्योगात काम करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन उदरनिर्वाहासाठी खाजगी क्षेत्राकडे वळले पाहिजे, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.  
उमेदवारांना कंपनीत भरावयाच्या पदासंबधी तसेच कंपनी विषयी माहिती दिली. यावेळी फिल्ड ऑफिसर, कस्टोडियम, ट्रेनिऑपरेटर, वर्कशाप वेल्डर, हेल्पर, सहायक व्यवस्थपक, वरिष्ठ कार्यकारी, या पदाची भरती करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती सुप्रिया पाटील यांनी केले. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थितहोती.
00000




मोबाईल ग्राहकांसाठी 4 जी सेवा
टुजी, थ्रीजी सिमकार्ड बदलण्याचे आवाहन
नांदेड, दि. 28 :- बीएसएनएल लवकरच नांदेड शहरात 4 जी सेवा सुरु करत आहे. यासाठी सर्व डेटा वापरणाऱ्या ग्राहकांनी आपले जुने 2 जी व 3 जी सीम कार्ड बदलून नवीन 4 जी सिमकार्ड जवळच्या बीएसएनएल ग्राहक केंद्रातून त्वरीत बदलून घ्यावे, असे आवाहन नांदेड बीएसएनएलचे सहाय्यक महाप्रबंधक (एस & एम) यांनी केले आहे.  
नांदेड शहरात ग्राहक सेवा केंद्र टेलीफोन भवन वजिराबाद, टेलीफोन भवन तरोडा व स्नेहनगर नांदेड येथील ग्राहक सेवा केंद्रात ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
0000000


लोकशाही दिनाचे 5 मार्च रोजी आयोजन
नांदेड, दि. 28 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. परंतू सोमवार 4 मार्च रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे लोकशाही दिन मंगळवार 5 मार्च 2019 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे.
यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000


प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत
2 लाख 79 हजार पात्र शेतकरी कुटूंबाची नोंदणी     
नांदेड, दि. 28 :- प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत नांदेड जिल्ह्यात 2 लाख 79 हजार 391 पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या शेतकरी कुटूंबांना 2 हजार रुपयाचा पहिल्या हप्त्याचा लाभ मिळत असून नांदेड जिल्ह्यात पात्र कुटुंबाची नोंदणी टक्केवारी 95.73 एवढी आहे.
जिल्ह्यात नमुना आठ अ प्रमाणे 7 लाख 95 हजार 800 खातेदार शेतकरी आहेत. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत परिशिष्ट-अ नुसार अनिवार्य माहिती संकलीत झालेली 1 हजार 568 गावातील परिपूर्ण असलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांची संख्या 2 लाख 91 हजार 866 आहे. पोर्टलवर नोंदणी केलेली गावे 1 हजार 562 एवढी आहेत. या योजनेच्या माध्यमातून अल्प व अत्यल्प भूधारक पात्र शेतकरी कुटुंबांना 3 हप्त्यात 6 हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे. शेतकरी कुटुंबाची सर्व ठिकाणचे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेती आहे अशा कुटुंबाची स्वतंत्र यादी करण्यात आली आहे. पात्र खातेदाराचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग, बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड, आधार क्रमांक ओळखपत्र, जन्म दिनांक आणि भ्रमणध्वनी क्रमांक आदिची माहिती संकलीत करुन ती संबंधित तहसील कार्यालयातून पोर्टलवर अपलोड केली जात आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  
00000


मतदार नोंदणीसाठी दि. 2 व 3 मार्चला राज्यभरात विशेष मोहीम
नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना विशेष संधी
नांदेड, दि. 28 : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार दिनांक 2 व रविवार 3 मार्च 2019 रोजी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
 दि. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तथापि, यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने नुकतीच दि. 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. तथापि, या मोहिमेवेळीही मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू न शकलेल्या नागरिकांना आणखी संधी देण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरीकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. बीएलओंकडे नमुना क्र. 6, 7, 8 व 8अ चे अर्ज उपलब्ध असतील. तसेच नागरीकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी दि. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी बीएलओंकडे उपलब्ध असेल.
सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी निरक्षर मतदारांसाठी मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असून गावांमध्ये मतदार यादीचे चावडी वाचनही करण्यात येणार आहे. सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना व जिल्ह्यातील नागरिक कल्याण संघटना (रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन- आरडब्ल्यूए) आणि सर्व ग्रामसभांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना देण्याबाबत कळविले आहे.
या कार्यक्रमाची माहिती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकाची (बीएलए) नेमणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे अशी विनंतीदेखील राजकीय पक्षांना करण्यात आली आहे.
मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहिती www.ceo.maharashtra.gov.in  या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1950 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मतदार नोंदणीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहनही मुख्य निवडणूक‍ कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000

Wednesday, February 27, 2019


प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना
1 हजार 562 गावातील 2 लाख 76 हजार
शेतकरी कुटूंबांना पहिल्या हप्त्याचा लाभ सुरु  
नांदेड, दि. 27 :- प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत नांदेड जिल्ह्यात 1 हजार 562 गावातील 2 लाख 76 हजार 148 लाभार्थी शेतकरी कुटूंबांना 2 हजार रुपयाचा पहिल्या हप्त्याचा लाभ मिळत आहे. या योजनेत माहिती अपलोड करण्यात नांदेड जिल्हा अग्रेसर असून माहिती अपालोड करण्यात आलेली पात्र कुटुंबांची टक्केवारी 94.61 एवढी आहे.
नांदेड जिल्ह्यात नमुना आठ अ प्रमाणे 7 लाख 95 हजार 800 खातेदार शेतकरी आहेत. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत परिशिष्ट अ नुसार अनिवार्य माहिती संकलीत झालेली 1 हजार 568 गावातील परिपूर्ण असलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांची संख्या 2 लाख 91 हजार 866 एवढी आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्प व अत्यल्प भूधारक पात्र शेतकरी कुटुंबांना 3 हप्त्यात 6 हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे.   
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या गठीत आहे.  शेतकरी कुटुंबाची सर्व ठिकाणचे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेती आहे अशा कुटुंबाची स्वतंत्र यादी करण्यात आली आहे. पात्र खातेदाराचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग, बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड, आधार क्रमांक ओळखपत्र, जन्म दिनांक आणि भ्रमणध्वनी क्रमांक आदिची माहिती संकलीत करुन ती संबंधित तहसील कार्यालयातून पोर्टलवर अपलोड केली जात आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
00000


मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
जिल्हा ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनाचे द्घाटन
नांदेड दि. 27 :- दरवर्षी ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने कुसुमाग्रजांच्या व इतर मराठी ग्रंथाचे नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक निलेश सांगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
          यावेळी प्रा. अनिल कोलते व जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, संजय कर्वे, मुक्तीराम शेळके, के.एम.गाडेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. हे ग्रंथप्रदर्शन सर्वांसाठी खुले असुन सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
000000


राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत
12 बालके हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना
नांदेड दि. 27 :- हृदयरोग आढळून आलेल्या 12 बालकांना हृदय शस्त्रक्रियासाठी घाटकोपर मुंबई येथील हिंदुसभा रुग्णालय येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तपोवन या एक्सप्रेस रेल्वेने पाठविण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ ए. पी. वाघमारे, जिल्हा समन्वयक अनिल कांबळे, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि बालकांचे पालक उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात अंगणवाडी व शाळातील बालकांची 45 आरोग्य पथकामार्फत दरवर्षी आरोग्य तपासणी करण्यात येते. यार्षात शुन्य ते 18 वयोगटातील 7 लाख 68 हजार 746 बालकांपैकी 6 लाख 80 हजार 367 बालकांची जानेवारी 2019 अखेर आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत 4 हजार 954 बालकांना ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड आदी ठिकाणी निदान व उपचार करण्यात आले. यात 102 बालके हृदयरोगाची आढळून आली त्यापैकी 48 बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर आज 12 बालकांना हृदय शस्त्रक्रियासाठी घाटकोपर मुंबई येथील हिंदुसभा रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे तर 26 बालकांना औषधोपचार व पाठपुरावा करण्यात आला आहे. उर्वरित 16 बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया मार्च 2019 मध्ये करण्याचे नियोजन करण्यात आहे. इतर शस्त्रक्रियेची 172 बालके आढळून आली असून त्यापैकी 120 बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर 20 बालकांना औषधोपचार व पाठपुरावा केला आहे. उर्वरित 32 बालकांची इतर शस्त्रक्रिया मार्च 2019 मध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय नांदेड यांनी दिली आहे.
00000


अभ्यास करताना ध्येय मोठे ठे तयारी करा
-         निलेश सांगडे                  
              
नांदेड दि. 27 :- विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ध्येय मोठे ठेवुन स्वत:ला झोकून देऊन अभ्यास करावा, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक निलेश सांगडे यांनी केले. ते जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर मनपा व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने उज्ज्वल नांदेड मोहिमेअंतर्गत नुकतेच आयोजित दोन दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
          या शिबीरात विज्ञान विषयाचे प्रमुख मार्गदर्शक अनिल कोलते व जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरवात प्रेरणा गीत व पुलवामा हल्यात शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्याचे स्वागत ग्रंथ देऊन करण्यात आले.
        प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार आरती कोकुलवार यांनी मानले. शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी प्रताप सुर्यवंशी, बाळू पावडे, संजय कर्वे, मुक्तीराम शेळके,के. एम. गाडेवाड, रघुविर यांनी सहाय्य केले.
000000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...