Monday, September 17, 2018

मराठवाडा विकासासाठी विशेष कार्यक्रमात निधी उपलब्ध ; विविध योजनेत सहभाग घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी हातभार लावावा - राज्यमंत्री केसरकर मुक्तीसंग्राम दिनी राष्ट्रध्वज वंदन ; हुतात्म्यांना पुष्पचक्र, मानवंदनेने आदरांजली


मराठवाडा विकासासाठी विशेष कार्यक्रमात निधी उपलब्ध ;
विविध योजनेत सहभाग घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी हातभार लावावा
                                                    - राज्यमंत्री केसरकर
   मुक्तीसंग्राम दिनी राष्ट्रध्वज वंदन ; हुतात्म्यांना पुष्पचक्र, मानवंदनेने आदरांजली

नांदेड दि. 17 :-मराठवाड्याच्या जलद विकासासाठी विशेष कार्यक्रम-2018 आखण्यात आला आहे. कृषी सिंचन, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी विपणन व फलोत्पादन, बी-बियाणे, कृषि यांत्रिकीकरण, कृषी विद्यापीठ बळकटीकरण, रेशीम उद्योग, कृषी संलग्न व इतर योजना विविध क्षेत्रासाठी शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या योजनेत सहभागी होऊन जिल्ह्याच्या विकासासाठी हातभार लावावा. ही स्वातंत्र्यसेनानींना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामिण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ मोठ्या उत्साहात आज संपन्न झाला. यावेळी राज्यमंत्री श्री. केसरकरयांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. समारंभात शुभेच्छा संदेश देतांना श्री. केसरकर बोलत होते.
 तत्पूर्वी माता गुजरीजी विसावा उद्यानातील हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली तसेच मानवंदना देण्यात आली. ध्वजवंदनापूर्वी राज्यमंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार, स्वातंत्र्य सैनिकांच्यावतीने स्वातंत्र्य सेनानी नारायणराव भोगावकर, महापौर शिलाताई भवरे, आमदार सर्वश्री अमर राजुरकर,राम पाटील रातोळीकर, डी. पी. सावंत, हेमंत पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मनपा आयुक्त लहुराज माळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोककाकडे, पोलीस अधीक्षकसंजय जाधव, गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे,अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, माजी सैनिक संघटनेच्यावतीने रामराव फडके, उपस्थित जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, पदाधिकारी, अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, आदींनी पुष्पअर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
शुभेच्छापर संदेशात राज्यमंत्री श्री. केसरकर म्हणाले, मराठवाड्याला निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींना वंदन करण्याचा हा क्षण आहे. मराठवाड्याच्या भुमीपुत्रांसह अनेकांनी मराठवाड्याला निजामाच्या मगरमिठीतून सोडविण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न केले. त्यांचे हौतात्म्य आपण विसरता कामे नये. मराठवाड्याने शौर्याची परंपरा कायम राखली. स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्यांची परंपरा मराठवाड्याला या मुक्तीसंग्रामातून मिळाली आहे.  
आपल्या जीवाची तमा न बाळगता मराठवाडा मुक्तीसंग्रामात सहभाग घेतलेल्या हुतात्म्यांचा नामोल्लेख करुन या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या कार्याचे मोल काढणं शक्य नाही, असे श्री. केसरकर यांनी सांगितले.   
राज्यमंत्री केसरकर पुढे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक प्रयत्न झाले असून राज्य शासनामार्फत मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी विशेष कार्यक्रम 2018 आखण्यात आला आहे. कृषी सिंचन, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी विपणन व फलोत्पादन, बी-बियाणे, कृषि यांत्रिकीकरण, कृषी विद्यापीठ बळकटीकरण, रेशीम उद्योग, कृषी संलग्न व इतर योजना, पशुसंवर्धन व कुकुटपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विकास, कौशल्य विकास व रोजगार निर्मिती व उद्योग, मानव संसाधन विकास, वनाधारीत उद्योग, वीज, पर्यटन, आरोग्य, दळणवळण अशा विविध क्षेत्रासाठी शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. असेही राज्यमंत्री केसरकर यांनी सांगितले.
दुरुस्त केलेल्या हुतात्मा स्मारकांचे होणार लोकार्पण
हुतात्मा स्मारक मराठवाड्यात विशेषत: नांदेड जिल्ह्यामध्ये उभारली आहेत. ही सर्व स्मारके शासनाने दुरुस्त केली असून स्वातंत्र्याच्या इतिहासाचं तरुण पिढीला त्याठिकाणी ज्ञान व्हावे म्हणून विविध माध्यमातून माहिती हुतात्मा स्मारकात दाखविली जाईल. ही दुरुस्त केलेली स्मारक आणि त्यामधील विविध नवीन सुविधा त्यामध्ये ग्रंथालय, स्वातंत्र्याचा इतिहास दाखविण्याची सोय असेल. याचे लोकार्पण येत्या 2 ऑक्टोंबरला होणार आहे. आपल्या भागात ही स्वातंत्र्य स्मारक असतील त्या-त्या ठिकाणी सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी उपस्थित राहून या दिनाचे महात्म्य वाढवावं, असे आवाहन शेवटी राज्यमंत्री केसरकर यांनी केले.
यावेळी हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभासमोर पोलीस दलाच्या पथकाने सावधान सलामी, शोकशस्त्र, सलामीशस्त्र, बाजूशस्त्र आणि मान्यवरांनी आदरांजली वाहिल्यानंतर हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली. पोलीस वाद्यवृंद पथकानेही बिगूल धून वाजवून सलामी दिली. यावेळी सर्व उपस्थितांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. त्यानंतर राष्ट्रध्वजाचे वंदन आणि राष्ट्रीय सलामी झाली. याप्रसंगी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिकेचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. राज्यमंत्री श्री. केसरकर यांनी स्वातंत्र्य सेनानी व जेष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांना मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. राखीव पोलीस निरीक्षक सहदेव पोकळे यांनी परेड कमांडर म्हणून संचलन केले. शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी समारंभाचे सुत्रसंचलन केले. या समारंभास नागरिक, विविध शाळेतील विद्यार्थी, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000










No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...