अवैधरित्या
किटकनाशकांची विक्री करणाऱ्या
सहा कृषि
केंद्राचे परवाने निलंबीत
नांदेड,
दि. 24 :- किटकनाशक विक्री केंद्राच्या
तपासणीत राज्यातील इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून किटकनाशके ही उगम
प्रमाणपत्राशिवाय आणण्यात आल्याचे आढळून आले आहे. नांदेड नवा मोंढा येथील 6 कृषि केंद्राचे
किटकनाशक औषधी विक्रीचे परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबीत करण्यात आले आहेत, अशी
माहिती नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी दिली आहे.
कृषि आयुक्त पुणे यांनी 29 जुलै रोजी नांदेड दौऱ्यावर असतांना अवैधरित्या किटकनाशकांची
विक्री, साठवूणक, उत्पादन, पॅकींग होत असल्याचे आढळून आल्यास तात्काळ कार्यवाही
करण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानुसार
तपासणी पथकाने नवा मोंढा नांदेड येथील मोदी ॲग्रो जेनेटिक्स, शिवम एजन्सीज, सिद्धी
विनायक अॅग्रो एजन्सीज, सचिन सिड्स कंपनी, व्यंकटेश्वरा ॲग्रो एजन्सीज, साई सिड्स
ॲण्ड पेस्टीसाईड्स या केंद्राच्या परवानाधारकाने किटकनाशकाचे स्त्रोत परवानामध्ये
समाविष्ट न करता खरेदी केल्याचे आढळून आले आहे. या कृषि सेवा केंद्राकडील संबंधीत
साठ्यास विक्री बंदचा आदेश देण्यात आला आहे. हा साठा साधारणपणे 85 लाख रुपये
किंमतीचा आहे.
कृषि आयुक्त आणि विभागीय कृषि सहसंचालक लातूर यांचे सुचनेनुसार कपाशीवरील
बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव पाहता शेतकऱ्यांचा फवारणीवरील कल वाढेल हे लक्षात
घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार व किफायतशीर किंमतीमध्ये किटकनाशके मिळावीत
यासाठी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांना कृषि निविष्ठा केंद्राच्या तपासणीचे आदेश
दिले होते. पुढील कार्यवाही किटकनाशक नमुन्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर करण्यात
येईल, अशी माहिती कृषि विभागाकडून करण्यात आली आहे.
00000
No comments:
Post a Comment