Thursday, June 14, 2018


आत्महत्या टाळण्यासाठी जागरुकता आवश्यक
-डॉ. नीलम मुळे : मुलाखतकार - देवेंद्र भुजबळ.
           
समाजात दिवसेंदिवस आत्महत्यांचे, मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनुवंशिकता आणि परिस्थितीजन्य विविध कारणांमुळे हे घडत आहे. राज्य सरकारने या बाबीचे गांभिर्य ओळखून 24 फेब्रुवारी, 2015 पासून ''104'' या क्रमांकाची हेल्पलाईन सुरु केली आहे.  मानसिक आजार झालेल्या व्यक्तींनी, त्यांच्या कुटुंबातील, नात्यातील व्यक्तींनी, कार्यालयातील सहकाऱ्यांनी, मित्रांनी संबंधित रुग्णांची लक्षणे ओळखून तत्काळ मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतल्यास या आत्महत्या टळू शकतील, असे मानसरोग तज्ज्ञ डॉ. नीलम मुळे यांनी नेटभेटमध्ये सांगितले.
डॉ. नीलम मुळे  मानसरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी मानसशास्त्रात मास्टर्स पदवी घेतली आहे. शिवाय निसर्गोपचार, योगा, ध्यानधारणा यातील 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. आज समाजातील वाढत्या मानसिक समस्या आणि त्यावर उपाय याबाबत त्या सतत जनजागृती करीत आहेत.
मानसिक आजार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या आधीच्या आई/वडिलांपैकी सहा पिढ्यांमध्ये कुणाला मानसिक आजार असेल तर शक्यता खूप असते. दुसरे कारण म्हणजे परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळेही मानसिकतेवर विपरित परिणाम होतो. मानसिक आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे अशा व्यक्ती संशयी प्रवृतीच्या होतात. त्यांना आपल्याविरुद्ध कुणी काही कटकारस्थाने रचतात असे वाटत रहाते. परत कुठल्यातरी विशिष्ट गोष्टीची सतत भिती वाटत राहते. त्या एकच गोष्ट सतत करीत राहतात. या आजारांची नावे म्हणजे डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया (त्यात परत पॅरानॉईया एक प्रकार), कॅटॉटॉनिक, एंक्सायटी डिसऑर्डर, (दुचिंता) बायपोलर डिसऑर्डर अशी आहेत. या आजारांच्या लक्षणावरुन ती ओळखता येतात.
स्किझोफ्रेनियामध्ये रुग्णाचे मन कशात लागत नाही. त्याच्या मनात सतत असंबंद्ध विचार येत राहतात. तो खूप आळशी बनतो. हा रुग्ण लगेच ओळखता येतो. कॅटॉटॉनिकमध्ये रुग्ण एकाच स्थितीत दिवसेंदिवस त्याच स्थितीत राहू शकतो. एका पायावर उभे राहिले तर तसेच, एक टक पहात राहिले तर तसेच राहतील. अशा रुग्णांना शॉक ट्रिटमेंट द्यावी लागते. पण अशा रुग्णांचे प्रमाण कमी असते.
पॅरानॉईयामध्ये रुग्ण संशयखोर असतात. ते सतत संशय घेत असतात. बायको असेल तर नवऱ्याचा, नवरा असेल तर बायकोचा. त्यामुळे अशा जोडप्यांमध्ये सतत भांडणे होतात. वैवाहिक जीवन कष्टप्रद होते. बऱ्याचदा अशा विवाहांची परिणती शेवटी घटस्फोटात होते. प्रसंगी काही रुग्ण जोडीदाराची हत्या पण करतात. त्यांच्या डोक्यात ते सतत कटकारस्थाने रचत असतात. कधीतरी शेवटी त्यांच्या हातून कृती घडते.
डिप्रेशन हे अनुवांशिकतेमुळे होऊ शकते. तसेच ते बाह्य वातारणामुळेही होऊ शकते. घरातील वातावरणही कारणीभूत असू शकते. अशी व्यक्ती मनातील गोष्टी कुणाशी बोलत नाही, ती एकलकोंडील बनते. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये लवकरच जाते. काहीवेळा अशा व्यक्तींच्या जीवनात असे काही प्रसंग येतात की, ते बोलत नाहीत आणि एकलकोंडेपणा वाढत जातो. फोबियामध्ये व्यक्तीला एका विशिष्ट गोष्टीची भिती वाटत राहते. ही भिती उंचीची, पाण्याची, गर्दीची, सभेत बोलण्याची असते. एका मर्यादेपलिकडे भिती गेली की, त्याला फोबिया म्हणतात. रुग्णाच्या मानसिक आजाराचे निदान होण्यासाठी त्याचे कुटुंब, नातेवाईक, मित्र, सहकारी यांची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यांनी रुग्णाची लक्षणे ओळखून त्याला तत्काळ मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले पाहिजे. या रुग्णांचे उपचार म्हणजे त्यांना मानसोपचार तज्ज्ञाने लिहून दिलेली औषधे नियमितपणे घेणे, गरजेनुसार विद्युत लहरींचा वापर करणे ही होत. उपचारांचा कालावधी रुग्णाच्या आजाराच्या प्रमाणावर अवलंबून असते. स्किझोफ्रेनियामध्ये मात्र आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात. पॅरानॉईयाच्या रुग्णास डिप्रेशनमध्ये गोळ्यांच्या प्रमाणापेक्षा समुपदेशन जास्त महत्वाचे असते. डिप्रेशन काही काळापुरते असू शकते. वेळेवर योग्य उपचाराने ते कायमचे बरे होऊ शकते. पण वेळीच उपचार घेतल्यास असे रुग्ण आत्महत्येस प्रवृत्त होतात किंवा अन्य व्यक्तीची हत्याही करु शकतात. भावनिक, संवेदनशील व्यक्तींना डिप्रेशन येण्याची शक्यता जास्त असते.
समाजात आज जीवघेणी स्पर्धा, तुलना यामुळे डिप्रेशनचे प्रमाण वाढताना दिसते. यास एकल कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीत बोलण्यासाठी, समजून घेण्यासाठी घरातील आजी, आजोबा, काका, काकू, इतर भावंडे असतात. त्यामुळे संयुक्त कुटुंबात डिप्रेशनचे प्रमाण अत्यल्प असते. आईवडिल दोघेही नोकरीला असणाऱ्या कुटुंबातील मुलांमध्येही डिप्रेशनचे प्रमाण अधिक असते. परंतु दोघांनाही नोकरी/व्यवसाय करणे आवश्यकच असेल तर त्यांनी मुलांची भावनिक, मानसिक, बौद्धिक काळजी घेतली पाहिजे. त्यांच्याशी सतत संवाद साधला पाहिजे. लहान मुले आपल्याला वेळोवेळी समजून घेत असतात, त्यामुळे त्यांना आपण समजून घेतले पाहिजे. एकत्र चहा घेणे, निदान रात्रीचे जेवण एकत्र घेणे, घराशी संबंधित बाबींमध्ये त्यांचे मत विचारणे, त्यांना मान देणे अशा गोष्टी फार महत्वाच्या ठरतात.
समाजात याविषयी जागृती होण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिणे, महिला मंडळे, शाळांमध्ये, कॉलेजमध्ये पालकसभा, कंपन्यामध्येही प्रशिक्षण घेणे असे उपक्रम डॉ. मुळे सतत करीत असतात. व्यक्तीने कार्यालयात कामाला व्यक्तीगत पातळीवर घेऊ नये तर ते सामुहिक जबाबदारी म्हणून पार पाडले पाहिजे. एकमेकांविषयी द्वेष, मत्सर असता कामा नये. एकमेकांशी सतत संवाद साधला पाहिजे. कार्यालयात निरोगी आणि पोषक वातावरण राहिले पाहिजे.
आपले विचार अनियंत्रित होऊ नये म्हणून योगा आणि ध्यानधारणेचा फार उपयोग होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान दहा मिनिटे तरी ध्यानधारणा करायला हवी. त्यामुळे मन समतोल राहण्यास मदत होते. आपण मनाला सतत सकारात्मक सूचना देत राहिले पाहिजे. स्वत: डॉ. मुळेही नियमित योगासने, ध्यानधारणा करीत असतात. आपले मन हे रिकाम्या भांड्यासारखे असते. त्यात चांगले विचार टाकले तर चांगली कृती होते. नकारात्मक विचार टाकले तर व्यक्ती कृतीशून्य होते किंवा नकारात्मक बाबी करण्यास प्रवृत्त होते.
आयुष्यात आपण संकटाला कसे सामोरे जातो, तेही खूप महत्त्वाचे आहे. आपण नशिबाला, देवाला दोष देतो. पण संकटाला संधी समजलो तर आपण ते आव्हान पेलू शकतो आणि त्यातून मार्ग काढू शकतो. म्हणून व्यक्तीने भविष्याचा अतिविचार करता, वर्तमानकाळ कसा चांगला होईल हे पाहिले पाहिजे. जीवनाकडे सकारात्मक वृत्तीने पाहिले पाहिजे.
आजकाल आईवडिल दिवसभर बाहेर राहतात. पूर्वी मुले फक्त टीव्ही पाहू शकायची पण आता इंटरनेटमुळे चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टीही मुलामुलींपर्यंत तत्काळ पोहोचतात. त्यामुळे पालकांनी मुलामुलींना योग्य वेळीच सर्व गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. संपूर्ण आयुष्य ही एक परीक्षा असते, हे आपण समजून घेतले पाहिजे. ताणतणावांना दूर ठेवण्यासाठी व्यक्तीला काही ना काही छंद असला पाहिजे. आपली आवड काय आहे ? हे त्या व्यक्तीने ओळखले पाहिजे. वाचन, लेखन, पोहणे, फिरणे, खेळणे, सायकल चालविणे, मित्र मंडळींशी गप्पा गोष्टी करणे, असे काही छंद जोपासले पाहिजेत.
-देवेंद्र भुजबळ,
संचालक (माहिती)

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...