Friday, May 4, 2018


ग्राम स्वराज अभियान  
राष्ट्रीय स्तरावरील योजना
ग्रामीण भागातील गरिबांपर्यत पोहचवावी
- केंद्रीय निरीक्षक रेड्डी

नांदेड, दि. 4 :- ग्राम स्वराज अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील विविध योजना ग्रामीण भागातील गरिबांपर्यंत पोहचवावी, असे निर्देश ग्राम स्वराज अभियानातील केंद्रीय पथकाचे निरीक्षक सुब्रमण्यम रेड्डी यांनी दिले. या अभियानांतर्गत संबंधित विभागांनी राबविलेल्या उपक्रमाचा आढावा केंद्रीय निरीक्षकांनी स्नेहनगर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निवासस्थानी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावर आयोजन करण्यात आले आहे.  
भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्यावतीने 14 एप्रिल ते 5 मे 2018 या कालावधीत "ग्राम स्वराज अभियान" राबविण्यात येत आहे. या अभियानाची अंमलबजावणी कशाप्रकारे होत आहे तसेच या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय निरीक्षकांचे दोन पथक प्रधानमंत्री कार्यालयाच्यावतीने नांदेड जिल्ह्यात दाखल झाले आहे. यात केंद्रीय निरीक्षक सुब्रमण्यम रेड्डी, उदय कुमार यांचे एक पथक असून दुसऱ्या पथकात गृहनिर्माण आणि शहर प्रकरण विभागाचे उपसचिव अखिल सक्सेना आणि वाणिज्य विभागाचे उपसचिव मुरलीधर मिश्रा यांचा समावेश आहे. ही दोन पथके जिल्ह्यातील 20 निवडक गावात प्रत्यक्षात भेटी देऊन केंद्र शासनाच्या कल्याणकारी उपक्रमाच्या अंमलबजावणीची पाहणी करुन मार्गदर्शन करीत आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  व्ही. आर. कोंडेकर, आर. डी. तुबाकले, जी. एल. रामोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रविण घुले, जिल्हा कृषि अधिकारी पंडीत मोरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ए. बी. कुंभारगावे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. आर. रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रीय निरीक्षकांनी भेट दिलेल्या गावामध्ये राबविलेल्या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले असून याबाबतचा संकलीत अहवाल व भेटी दरम्यान नागरिकांनी केलेल्या सूचना व मागणीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धींगत करणे, ग्रामीण भागातील गरीबांपर्यंत पोहचणे, सद्यस्थितीत कार्यरत योजनांबाबत माहिती घेणे, नवीन उपक्रमांचा समावेश करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, स्वच्छता सारख्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांना पुढे घेऊन जाणे व पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करणे या विविध कल्याणकारी उपक्रमांचा यात समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत सामाजिक न्याय दिवस (14 एप्रिल), स्वच्छ भारत दिवस (18 एप्रिल), उज्ज्वला दिवस (20 एप्रिल), राष्ट्रीय पंचायत राज दिवस (24 एप्रिल), ग्राम स्वराज दिवस (28 एप्रिल), आयुष्यमान भारत दिवस (30 एप्रिल), किसान कल्याण दिवस (2 मे ), आजिविका दिवस (5 मे) तर पोषण अभियान (14 - 24 एप्रिल 2018 ) चा समावेश आहे.
या कालावधीत देशातील जास्तीतजास्त गरीब कुटुंब असलेली 21 हजार 58 गावांची निवड करण्यात आली असून "सबका साथ सबका गाव सबका विकास" या विशेष मोहिमेद्वारे प्रधानमंत्री उजाला योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य), प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना व मिशन इंद्रधनुष्य या सात योजना या सर्व गावांमध्ये राबवून त्या ठिकाणी शंभर टक्के साध्य पूर्ण करण्याचा मानस आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 20 गावांचा समावेश करण्यात आला आहे.
बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या केंद्रीय पथकासोबत संपर्क अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी प्रदिप सोनटक्के, डी. आय. गायकवाड, गणेश शिवरात्री, एस. व्ही. येवते हे सहकार्य करीत आहेत.
ग्राम स्वराज अभियानांतर्गत
आजिविकास दिवसाचे आयोजन  
ग्राम स्वराज्य अभियान व कौशल्य विकास अंतर्गत आजिविकास दिवस शनिवार 5 मे 2018 रोजी विष्णुपुरी येथील सहयोग कॅम्पस येथे सकाळी 10 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषणाचे थेट प्रेक्षपण दाखविण्यात येणार आहे. नागरिक, महिला बचत गटातील सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.  
यावेळी दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण व महिला स्वयंसहाय्यता बचत गटांची माहिती व यशोगाथा सांगण्यात येणार आहेत. तसेच ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.  
0000000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...