Friday, February 23, 2018


मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजनेस
शेतकरी, इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 23 :- महाराष्ट्र राज्य निरनिराळे पिके, फळपिके या उत्पादनात आघाडीवर असले तरी प्रक्रिया उद्योग, कापणीनंतरच्या पायाभूत सोयी कमतरता असल्याने मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. यासाठी प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी राज्य पुरस्कृत “मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजनेस” मंजूरी मिळाली आहे. शेतकरी व इच्छुकांनी या योजनेचा लाभ द्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. टी.एस. मोटे यांनी केले आहे.
याकरिता शासकीय / सार्वजनिक उद्योग, सक्षम शेतकरी उत्पादक कंपनी / गट महिला स्वंयसहाय्यता गट, खाजगी उद्योग क्षेत्र, ग्रामीण बेरोजगार युवक, सहकारी संस्था अशा अन्न प्रक्रिया प्रकल्पापैकी फळे व भाजीपाला या सारख्या नाशवंत शेतमाल प्रक्रियेच्या प्रकल्पांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तसेच अनुदान मर्यादा व सयंत्रे आणि प्रक्रिया प्रकल्प बांधकामाच्या खर्चाच्या 30 टक्के अनुदान कमाल मर्यादा 50.00 लाख रुपये असेल. ही प्रक्रिया कर्ज निगडीत असून याकरिता पूर्वी शासकीय, अशासकीय संस्थाकडून अनुदान घेतले असल्यास त्याचा तपशिल अर्जासोबत देणे अनिवार्य आहे. या योजनेत कृषि व अन्न प्रक्रिया प्रस्थापना, स्तरवृध्दी व आधुनिकीकरण, शीतसाखळी योजना, मनुष्यबळ निर्मिती व विकास योजना तसेच राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियानांतर्गत मंजूर, भौतिकदृष्ट्या उत्पादन सुरु व प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना अर्थसहाय्य देय राहील. संबंधितांनी अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, नवा मोंढा नांदेड यांचेशी दूरध्वनी क्र. 02462-284252 वर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. टी.एस. मोटे यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...