Wednesday, November 22, 2017

खड्डे भरण्याच्या अभियानासोबत
रस्ते, पुल, इमारतींची कामे वेळेत पुर्ण करावीत     
- सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील
नांदेड, दि. 22 :- रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या अभियानासोबत विभागातील इतर रस्ते, पुल व इमारतींची कामे विहित कालावधीत पुर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.     
यावेळी आ. हेमंत पाटील, आ. तुषार राठोड, उपसचिव के. टी. पाटील, औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मुकूंद सुरकुटवार, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, नांदेड कार्यकारी अभियंता विवेक बडे, भोकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर तोटावार, माधव शंखपाळे तसेच उपअभियंता व त्यांचे अधिपत्याखालील सर्व शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, विविध विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
बांधकाम मंत्री श्री. पाटील म्हणाले की , रस्ते बांधकामासाठी नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन रस्ते बांधणीची कामे जास्तीतजास्त टिकाऊ राहतील व वाहतूकीस सोईचे होईल यादृष्टीने कार्यवाही करावी. जिल्हा परिषदेकडून हस्तांतरित झालेले रस्ते यापुर्वी रोहयो योजनेतून लोकांना रोजगार देण्याच्या हमीपोटी बांधण्यात आली आहेत. बहुतांश रस्ते काळ्या मातीतुन जाणारी असून मर्यादेपेक्षा जास्त वजनाची वाहने रस्त्यावरुन जात असल्याने रस्ते खराब होतात. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरुन रस्ते अधिक टिकाऊ राहतील. त्यादृष्टीने बांधकाम करणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी आढावा बैठकीतून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात येत आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या भेटी नोव्हेंबर 2017 अखेर पुर्ण होतील. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळेल. प्रत्येकांनी स्वत:ची जबाबदारी समजून चांगल्या प्रकारे काम करावे, असे निर्देशही बांधकाम मंत्री श्री. पाटील यांनी दिले. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व  कर्मचाऱ्यांची  रिक्त पदे भरण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही सुरु असून लवकरच रिक्त पदे भरण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रस्ते, इमारती कामांची देखभाल व दुरुस्ती सन 2014-2015 ते 2016-2017 पर्यंतची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तर सन 2014 पुर्वीचे प्रलंबित देयकाबाबत संबंधित कंत्राटदारास देयके अदा करण्याचीही कार्यवाही करण्यात येईल. खात्यामार्फत पुर्ण करण्यात आलेल्या इमारती उपभोक्ता खात्यास तात्काळ हस्तांतरित करण्याचे, खड्डे भरण्यापलीकडील हाताबाहेर दुरुस्ती असलेल्या रस्त्यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर करावा. तसेच अशा कामांची निविदा लगेच काढून ही कामे हाती घेण्यात यावीत. यासाठी सिलेक्टिव्ह टेंडर पध्दतीचा अवलंब करण्याबाबत संबंधितांना मंत्री श्री. पाटील यांनी सुचना दिल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. पाटील यांना सार्वजनिक बांधकाम विभागाची मालमत्ता व रस्ते, पुल व इमारती यांची प्रगती, प्रस्तावित कामांची सद्यस्थितीबाबत चित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली.

**** 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...