Wednesday, October 11, 2017

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी सरासरी 60 टक्के मतदान
व्हीव्हीपॅटमुळे मतदारांना आपल्या मताची खात्री करणे झाले शक्य
            मुंबई, दि. 11: नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी 60 टक्के मतदान झाले. प्रभाग क्रमांक 2 मधील 31 मतदान केंद्रांवर प्रायोगिक तत्वांवर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्यात आला. त्यामुळे तेथील मतदारांना आपल्या मतदानाची खात्री करता आली. याचबरोबर बृहन्मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
           श्री. सहारिया यांनी सांगितले की, नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या 20 प्रभागांतील 81 जांगासाठी मतदान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर रांगा होत्या. त्या अनुषंगाने सुमारे 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये एकूण 37 मतदान केंद्रे होते. या सर्व केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीच्या माध्यमातून व्हीव्हीपॅटचा वापर करण्याचे नियोजन होते; परंतु तांत्रिक अडचणींमुळे 6 मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटचा वापर करता आला नाही. त्यासाठी कंपनीच्या अभियंत्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. अखेर या केंद्रांवर व्हीव्हीपॅटशिवाय मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
           प्रभाग क्रमांक 2 मधील मतदान केंद्र क्रमांक 4, 27, 29 आणि 31 वर व्हीव्हीपॅटद्वारे मतदान प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही; तर मतदान केंद्र क्रमांक 26 आणि 32 वर काही वेळाने व्हीव्हीपॅटची यंत्रणा बंद पडली. त्यामुळे तेथे नंतर व्हीव्हीपॅटशिवाय मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही सहा मतदान केंद्रे वगळून व्हीव्हीपॅट वापरण्यात आलेल्या सर्व 31 मतदान केंद्रांवर संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. तेथील मतदारांना आपण दिलेल्या उमेदवारालाच किंवा पक्षालाच आपले मत जात असल्याची खात्री करणे शक्य झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
          प्रभाग क्रमांक 2 मधील व्हीव्हीपॅटद्वारे मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेल्या मतदान केंद्रांची मतमोजणी त्यातून प्राप्त झालेल्या चिठ्ठ्या व कंट्रोल युनिट या दोन्ही प्रकारे केली जाईल. मात्र सर्व मतदान केंद्रांतील कंट्रोल युनिटद्वारे केल्या जाणाऱ्या मतमोजणीचा निकाल अंतिम असेल. मतमोजणी उद्या (ता. 12) सकाळी 10 वाजता सुरू होईल. मतमोजणी प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांना नांदेड येथे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेशही श्री. सहारिया यांनी दिले आहेत.
पोटनिवडणुकीसाठी मतदान
          बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 116, पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्र. 21अ, कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्र. 11; तर नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 35अ च्या रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील आज मतदान झाले. त्यासाठी बृहन्मुंबई 50.64, पुण्यात 20.78, कोल्हापूरमध्ये 57.66 आणि नागपूरमध्ये 24.33 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या सर्व ठिकाणीदेखील उद्या (ता.  12) रोजी मतमोजणी होईल, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.

0-0-0

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1235 राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगावातील  शासकीय कार्यक्रम 2 जानेवारीपासून  नांदेड दि. २७ डिसेंबर : भारताचे माजी पंतप्रधान डॉ....