Saturday, September 2, 2017

विकास योजनांची माहिती देण्यासाठी  
"संवाद पर्व" उपक्रम निश्चित स्तुत्य
- पोलीस उपअधीक्षक बनकर
नांदेड, दि. 2 :- शासनाच्या विविध विकास योजना, निर्णय, उपक्रमांची माहिती संवादाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी "संवाद पर्व" सारखा उपक्रम निश्चित स्तुत्य आहे, असे प्रतिपादन नांदेडचे पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांनी केले.

शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना विविध शासकीय योजनेची माहिती देऊन जनजागृती करण्याकरीता "संवाद पर्व" हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्हा माहिती कार्यालय व श्री यादव गणेश मंडळ हनुमान पेठ (वजिराबाद) नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने काल आयोजित "संवाद पर्व" कार्यक्रमात श्री. बनकर हे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, सामाजिक कार्यकर्ते वसंत मैय्या, प्रा. उमाकांत जोशी, गणेश मंडळाचे अध्यक्ष अक्षय यादव, छायाचित्रकार विजय होकर्णे, प्रा. डॉ. कैलाश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.  
सर्वसामान्य जनतेसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून युवकांना नौकरीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी शासन व जिल्हा प्रशासन मार्गदर्शन शिबीर घेत असते त्याचा लाभ घ्यावा. युवकांकडून अनेकविध विधायक कामे होऊ शकतात. त्यासाठी त्यांनी आपल्या शक्तीचा वापर करावा व समाजात चांगले बदल घडावावेत. चारित्र्य संपन्न जीवन जगुन आदर्श निर्माण करावा. गणेश मंडळांनी अनावश्यक खर्च टाळून समाजातील गोरगरीबांना आर्थीक मदत व विधायक बाबींवर अधीक भर दिला पाहिजे. शासनाच्या विविध योजनेतून स्वत:बरोबर समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा अशोक बनकर यांनी व्यक्त केली.
श्री. हुसे म्हणाले, शासनाच्या विविध योजनेची माहिती "संवाद पर्व" च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविली जाते. त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने "उज्ज्वल नांदेड" या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांकडून एमपीएससी, युपीएससी या परीक्षेसाठी मोफत तयारी करुन घेतली जात आहे. जिल्हा ग्रंथालयात मार्गदर्शनाबरोबरच अभ्यासिकेची चांगली सुविधा उपलब्ध आहे. मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी झाले आहेत. विधायक कामातून पुढची चांगली पिढी घडविण्यासाठी इच्छुकांना चांगली दिशा देण्यासाठी शासनाचे सर्व प्रयत्न आहेत, असे सांगितले.
"संवाद पर्व" या कार्यक्रमामागील उद्देश विषद करुन श्री. गवळी यांनी महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिकाची माहिती दिली. या मासिकात शासनाच्या विविध योजना, घेतलेले निर्णय, उपक्रम याची माहिती दिली जाते. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी लोकराज्य मासिक उपयुक्त आहे. मासिकाचे वर्गणीदार व्हावे असे आवाहन करुन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.  
यावेळी लोकराज्य मासिकाचे वाचक वसंत मैय्या म्हणाले, लोकराज्य मासिकातून शासनाची महत्वपुर्ण माहिती दिली जाते. कमी किंमतीत घरपोच पोहचणारे लोकराज्य मासिकाचे वार्षीक वर्गणीदार सर्वांनी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. उमाकांत जोशी यांनी, "संवाद पर्व" कार्यक्रमातून युवकांना भावी आयुष्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. युवकांनी आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टी, क्रियाशिलता, मनाचा मोठेपणा ठेवून पुढे गेले पाहिजे जीवनात यश नक्की मिळेल, असे सांगितले.
            प्रास्ताविकात छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्यासाठी "संवाद पर्व" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहून योजनेची माहिती देत आहेत, असे सांगितले तर प्रा. डॉ. कैलाश यादव यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
           
यावेळी उपस्थित मान्यवरांचा व श्री यादव गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जेष्ठ नागरिकांचा "लोकराज्य" अंक, "आपला जिल्हा नांदेड" पुस्तिका व "नांदेड जिल्हा वाटचाल विकासाची तीन वर्षपुर्तीची" ही घडीपत्रिका देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विशाल यादव, भारत यादव, गोकुल यादव, भानुदास यादव, नरसिंग मंडले, गौतम जैन, दीपक यादव, बीरबल यादव, बबलू यादव, सुमीत यादव, विजय बटावाले, स्वराज यादव, बंटी फुलारी, युवक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.  

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...