Tuesday, August 29, 2017

शहरात भव्य महाअवयवदान जनजागृती रॅली संपन्न
 सर्वांना अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 29 :- वैद्यकीय संचालनालय, आयुष संचालनालय व शासकीय आरोग्य विभागाच्यावतीने नांदेड शहरात भव्य महाअवयवदान जनजागृती रॅली आज काढण्यात आली. या रॅलीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी हिरवा झेंडा दाखून शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयापासून शुभारंभ केला.
यावेळी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्यामकुंवर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, डॉ. हंसराज वैद्य, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुरेश कदम, एमएमसीचे सदस्य डॉ. संजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.  


या रॅलीचा शिवाजीनगर, महात्मा फुले पुतळा मार्गे डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह येथे समारोप झाला. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी "अवयव दान अमुल्य दान", "मृत्युला रोखण्याची ताकद तुमच्या श्रेष्ठ दानात आहे" "असहाय्य रुग्णांना द्या जीवनाची अमुल्य भेट",  "अवयवदान करु या, समाधान सन्मान मिळू या", "अवयवदान करा आणि इतरांचे जीवन वाचवा", "कोणत्याही धर्माचा माणुस कोणासाठीही अवयवदान करु शकतो", "मरावे परी अवयवरुपी उरावे" असे फलक हातात घेऊन उत्साहात घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधत होते. वैद्यकीय विद्यार्थ्यांनी रॅलीत अवयवदान सर्वश्रेष्ठ दान असल्याचे पथनाट्याद्वारे बोलीभाषेतून नागरिकांना माहितीचे सादरीकरण केले.  
डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. म्हस्के म्हणाले की , अवयवदान चळवळ पुढे नेण्यासाठी तरुणाचा मोठा सहभाग असला पाहिजे. राज्यात मराठवाडा विभाग अवदानात अग्रस्थानी आहे. अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया नांदेडनी दोनवेळेस यशस्वी करुन दाखविली आहे. राज्यात हा उपक्रम चांगला राबवण्यात येत असून सर्वांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र अवयवदानात एका वर्षात देशात दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. यावर्षी पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी तसेच अवयवदानाची मोठी गरज ओळखून सर्वांनी अवयवदानाची संकल्प करुन अवयदानाचे जास्तीतजास्त संमतीपत्र भरुन दयावीत, असे आवाहन त्यांनी केले.  
यावेळी अधिष्ठाता डॉ. श्यामकुंवर यांनी शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयाकडून जिल्ह्यातील 33 महाविद्यालयात अवयवदानाविषयी प्रबोधनात्क कार्यक्रमातून जनजागृती करण्यात आले असे सांगितले. तर डॉ. सुरेश कदम यांनी रुग्णांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी, अवयवदानाला महत्व आहे. ग्रामीण जनतेतही अवयवदानाविषयी जनजागृती प्राधान्याने करणे आवश्यक आहे असे सांगितले. डॉ. संजय कदम यांनी अवयदानाची व्याप्ती वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे. अवयवदानाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत, माणसापर्यंत पोहचला पाहिजे यासाठी स्वयंसेवी संस्था, विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभागी होणे आवश्यक आहे, असे सांगितले.   
प्रास्ताविकात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गुंटूरकर म्हणाले, अवयवदानाच्या प्रतिक्षा यादीवरील रुग्णांना अवयवाची मोठी गरज आहे. अवयवदानाचे महत्व सर्वांनी ओळखून नातेवाईक, मित्रांना संमतीपत्र भरुन देण्याचे सांगावे, असेही आवाहन केले.  
कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनचे प्रमुख डॉ. राजेंद्र अमीलकंठवार, वैद्यकीय अधीक्षक वाय. एच. चव्हाण, प्रशासन अधिकारी र. ह. चंचलवार, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधीक्षक सुरजितसिंघ तबेलेवाले, वैद्यकीय अधिकारी, रोटरी क्लब, लायन्स क्लबचे पदाधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, यांची उपस्थिती होती. सुरुवातील मान्यवरांनी सरस्वती पुजन व धन्वंतरी स्तवन केले. यावेळी डॉ. संतोष शिरशीकर यांनी उपस्थितांना अवयवदानाची प्रतिज्ञा दिली तसेच अवयवदानाचे संमतीपत्र वाटप करुन भरुन घेण्यात आलीत. सुत्रसंचलन संतोष शिरशीकर यांनी तर आभार डॉ. हजारी यांनी मानले.  

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...