Sunday, July 30, 2017

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून  
रामा पोतरे यांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
            नांदेड दि. 30 :-  भोकर तालुक्यातील दिवशी बु येथील शेतकरी रामा लक्ष्मण पोतरे (वय 35) यांचे किनी येथे पीक विमा योजनेंतर्गत अर्ज भरत असतांना शनिवार 29 जुलै रोजी निधन झाले. त्यानंतर नांदेड जिल्हा प्रशासनाच्या संपर्कानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मयत शेतकरी रामा पोतरे यांच्या वारसांना 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.    
या घटनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी संपर्क केला होता. तसेच राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने रामा पोतरे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याबाबत चर्चा करण्यात आली होती.
            भोकर तालुक्यातील दिवशी बु येथील शेतकरी रामा लक्ष्मण पोतरे हे स्टेट बँक ऑफ इंडिया किनी येथील शाखेत पीक विमा योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठी रांगेत उभे असताना शनिवार 29 जुलै रोजी दुपारच्या सुमारास अचानक चक्कर येऊन जमिनीवर पडले. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र किनी येथे प्राथमिक उपचार करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आणत असताना रस्त्यामध्ये त्यांचे निधन झाले. रामा पोतरे यांना पत्नी श्रीमती सुनिता पोतरे, नऊ वर्षाचे आवळे-जावळे मुलगा चि. गौरव व मुलगी कु. गंगोत्री, वडील लक्ष्मण पोतरे (वय 70) व आई श्रीमती सावित्रीबाई पोतरे (वय 65) हे वारस आहेत.
0000000 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...