Friday, February 24, 2017

डिजीटल प्रदानांतर्गत सहा मार्च रोजी
नांदेडामध्ये डिजीधन मेळावा
नियोजन भवन येथे आयोजन
नांदेड दि. 24 :- केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमे अंतर्गत राज्यभरात डिजीधन मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात अशा या डिजीधन मेळाव्याचे सोमवार 6 मार्च 2017 रोजी आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नियोजन भवन मध्ये मुख्य कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यात डिजीटल प्रदानाशी निगडीत बँका, तसेच विविध व्यापारी कंपन्या, शासकीय विभाग आदी सहभागी होणार आहेत.
 रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच डिजीटल व्यवहारांची माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात डिजीटल व्यवहार करणाऱ्यांसाठीच्या भाग्यवान बक्षीस विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. मेळाव्यात बँका, आधार क्रमांकाशी निगडीत तसेच विविध डिजीटल प्रदान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या, मोबाईल कंपन्या, खते, इंधन आदी कंपन्याही सहभागी होणार आहेत.  मेळाव्यात बँका व इतर सहभागी घटक विविध प्रकारची दालने थाटतील. या दालनांद्वारे डिजीटल प्रदानाच्या व्यवहारांची प्रात्यक्षिके तसेच खरेदी आदीबाबत माहिती दिली जाणार आहे.
मेळाव्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित भाग्यवान विजेत्याची (लकी ड्रॅा) काढण्यात येणार आहे. या विजेत्यांना मुख्य समारंभात सन्मानितही करण्यात येणार आहे. या एक दिवसीय डिजीधन मेळाव्यात विविध दालनांद्वारे ग्राहक तसेच सामान्य नागरिकांना डिजीटल प्रदानाबाबत प्रशिक्षीत करण्याचा प्रयत्न राहणार आहे. यात बँका व्यापाऱ्यांसाठी पीओएस मशीन्सची नोंदणी करून घेतील. तसेच नवीन खाती उघडणे, आधार क्रमांकाशी बँक क्रमांक संलग्न करणे, विविध बँकाच्या युपीआय ॲप्सची माहिती देतील. याशिवाय खासगी मोबाईल कंपन्या, तसेच डिजीटल प्रदान क्षेत्रातील कंपन्या ई वॅालेटस्, मोबाईल वॅालेटस् यांची माहिती देतील. याशिवाय सेवा तसेच विविध वस्तू, तसेच खत, दूध, शेतकरी सोसायट्या, कृषीविषयक, बी-बियाणे, पुरवठा विभाग आदींनाही डिजीटल प्रदानांची माहिती देण्यासाठी दालन उभारता येणार आहेत.
या डिजीधन मेळाव्याच्या अनुषंगाने नुकतीच निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी बँक अधिकारी, तसेच विविध मोबाईल कंपन्यांचे, सेवा पुरवठादाराच्या प्रतिनीधींसोबत पुर्वतयारीची बैठक घेतली. यामध्ये सर्व संबंधितांना डिजीधन मेळाव्यात सहभागी होण्याचे तसेच नियोजनपुर्वक मेळावा यशस्वी करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...