Monday, February 13, 2017

निवडणुकीतील गैरप्रकारांवरील कारवाईसाठी
यंत्रणांनी आणखी सतर्क रहावे - काकाणी
जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक संपन्न
नांदेड दि. 13 :- जिल्हा परीषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस राहीले आहेत. त्यामुळे सर्वच यंत्रणांनी गैरप्रकार अवलंबिले जाणार नाहीत, यासाठी अधिक सतर्क राहावे, जेणेकरून मतदारांना निर्भय आणि मुक्त वातावरणात मतदान करता येईल, असे निर्देश जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. समितीची आज जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून श्री. काकाणी बोलत होते.
बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे कुलसचिव बी. बी. पाटील, राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक गणेश पाटील, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) अनुराधा ढालकरी,  जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, अग्रणी बँकेचे प्र. व्यवस्थापक जयंत वरणकर यांच्यासह आयकर, महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी यांनी निवडणूक कार्यक्रमांतर्गत सुरु असलेल्या विविध कार्यवाहीची माहिती दिली. निवडणुकीचा जाहीर प्रचार कालावधी मंगळवारी रात्री दहा वाजता संपणार आहे. मतदार याद्या जाहीर करणे, मतदान केंद्रांची निश्चिती, तेथील सुविधा, विविध पथकांसाठी वाहतूक तसेच अनुषंगीक व्यवस्था, वाहनांची उपलब्धता याबाबत माहिती देण्यात आली, तसेच चर्चा झाली.
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, आगामी दोन दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे यंत्रणांनी डोळ्यात तेल घालून सतर्क रहावे. वाहनांचा गैरवापर, तसेच अवैध दारू विक्री, दारुची अवैध वाहतूक यांना प्रतिबंध करण्यासाठी समन्वय राखावा. विशेषतः सीमावर्ती भागांवर लक्ष केंद्रीत करावे. त्यासाठी रात्रगस्त आणि स्थापन करण्यात आलेल्या पथकांमध्ये समन्वय ठेवावा. आर्थिक व्यवहारांबाबत आयकर, बँक, विक्रीकर विभाग यांनी नजर ठेवावी. जेणेकरून अन्य कुठल्या व्यवहारांच्याआडून निवडणुकीतील गैरप्रकारांसाठी अर्थ पुरवठा होणार नाही. पोलीस यंत्रणेनेही समाजकंटकांवरील कारवाईसाठी पुरेशी व्यवस्था करावी. निवडणूक शातंतेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी आणखी सतर्क रहावे.
निवडणुकीसाठी विनापरवाना वाहन वापरल्यामुळे आठ प्रकरणात कारवाई केल्याची माहिती परिवहन विभागाने दिली. तसेच अवैध दारू विक्रीबाबत संबंधित तहसील आणि उपविभागीय अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...