Thursday, February 2, 2017

लोकराज्य फेब्रुवारी 2017 चा 
करिअर विशेषांक प्रकाशित
नांदेड, दि. 2 :- लोकराज्य फेब्रुवारी 2017 चा 'करिअरच्या संधी' हा विशेषांक नुकताच प्रकाशित झाला आहे. स्पर्धा परीक्षा, व्यवसाय शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि बँकिंग आदी क्षेत्रातील करिअरच्या संधी या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असलेला हा अंक स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. शासन सेवा, खासगी आस्थापना व विविध व्यावसायिक क्षेत्रात आपले करिअर घडविण्यास इच्छुक असणारे उमेदवार व पाल्यांसाठी करिअरचे विविध पर्याय शोधणा-या पालकांसाठी हा अंक मार्गदर्शक ठरणार आहे.
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या मान्यवरांचे मार्गदर्शन  या क्षेत्रातील दिग्गज लेखकांनी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी लोकराज्यमध्ये आवर्जून केलेले लेखन हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. या अंकात 'अशा सेवा अशा संधी' या शीर्षकाखाली संघ लोकसेवा आयोगामार्फत ‍विविध महत्त्वाच्या पदांकरिता घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेविषयी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी 'तयारी नागरी सेवा परीक्षे'ची या लेखातून माहिती दिली आहे. तर या परीक्षेच्या विविध टप्प्यांची कशी तयारी करावी या विषयी 'तुम्ही जिंकणारच' हालेख विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांचे संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढावे यासाठी राज्यातील विविध ठिकाणच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांच्या माहितीचा या अंकात समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध पदांच्या परीक्षेविषयी माहिती असणाऱ्या लेखाचाही या अंकात समावेश करण्यात आला आहे. तसेच संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या यशवंतांची यशाची सूत्रे'यशाची प्रेरणा' या लेखामधून देण्यात आली आहेत.
आपल्या क्षमता ओळखून, शैक्षणिक पात्रता या आधारे तसेच आवड, छंद यातूनही उत्तम करिअर कसे करता येते हे 'करिअर कसे निवडावे' या लेखातून सांगण्यात आले आहे. तसेच आजचे युग हे माहितीयुग आहे. सध्या सोशल मीडियाचा वाढता वापर व सोशल मीडियामध्ये डिजिटल मार्केटिंग हे नवे क्षेत्र नावारुपाला आले आहे. यातील नवनव्या संधींचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक पात्रता असावी व या संधी कोठे उपलब्ध आहेत यासंबंधीची माहिती 'डिजिटल मार्केटिंग: नवे क्षेत्र' या लेखातून देण्यात आली आहे. तसेच बँकिंग क्षेत्रातील विविध परीक्षा, व्यवसाय शिक्षण आणि त्यामुळे मिळणाऱ्या रोजगाराची संधी, नर्सिंग क्षेत्रातील करिअर, जनसंपर्क आणि माध्यमांतील संधी, फाईन आर्ट आणि कृषी क्षेत्रातील कौशल्याधारित अभ्यासक्रमांच्या माहितीचा या अंकात समावेश करण्यात आला आहे. प्रत्येकाच्या घरात संग्रहणीय ठरावा असा हा अंक राज्यात स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध असूनया अंकाची किंमत फक्त 10 रुपये आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...