Tuesday, January 3, 2017

गावात पोहचून शेतकरी खातेदारांना बँकांनी
कॅशलेसचे प्रशिक्षण द्यावे - जिल्हाधिकारी काकाणी
रब्बी हंगाम पीक कर्ज वाटपाचाही आढावा
नांदेड, दि. 3 :- जिल्ह्यातील बँकांनी खातेदार असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचून रोकडरहित (कॅशलेस) डिजीटल पेमेंट व्यवहाराचे प्रशिक्षण द्यावे. त्यासाठी प्रशिक्षणांचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून श्री. काकाणी बोलत होते. बँकांनी रुपे कार्ड आणि शेतकऱ्यांना त्याच्या वापराबाबत माहिती द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, नाबार्डचे व्यवस्थापक राजेश धुर्वे तसेच जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत वरणकर तसेच विविध बँकांचे अधिकारी प्रतिनिधींची उपस्थिती होती.
बैठकीत जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी रोकडरहित व्यवहारासाठी बँकांनी ग्रामीण भागात पोहचून नागरिकांत जाणीव जागृती निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाबाबत तसेच रब्बी हंगामासाठीच्या कर्ज वाटपातील बँकांच्या सहभागाबाबत सर्वंकष आढावा घेतला. रब्बी हंगाम कर्ज वाटपात दिलेल्या उद्दीष्टा इतपत बँकांनी कर्ज वाटप कऱण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यातील बँकांनी त्यांच्या शाखांद्वारे खातेदार असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे. त्यांना रोकडरहित व्यवहाराबाबत प्रशिक्षीत करावे. त्यासाठी गावा-गावात प्रशिक्षणाचे कार्यक्रम घ्यावेत. बँक कर्मचाऱ्यांनाही रोकडरहित  व्यवहारांसाठी पुढाकार घ्यावा, यासाठी प्रशिक्षीत करावे. शेतकऱ्यांना रुपे कार्डच्या वापराबाबत माहिती करून द्यावी. त्याच्या वापराबाबतही शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, असेही श्री. काकाणी यांनी निर्देश दिले.
बँकांनी त्यांच्या शाखांद्वारे दत्तक घेतलेल्या गावांना रोकडरहित व्यवहारात स्वयंपुर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत. ग्रामीण भागात रोकडरहित व्यवहारांची जास्तीत जास्त माहिती पोहचल्यास, तसेच डिजीटल पेमेंट वाढल्यास, जिल्हा रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारात अग्रेसर राहील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. यावेळी बँकांनी रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगानेही गावा-गावात पोहचावे. या कर्ज वाटपातही डिजीटल पेमेंट होईल, यासाठी प्रयत्न करावे. कर्ज वाटपाचे उद्दीष्ट बँकांनी पुढाकाराने पुर्ण करावे, असे निर्देशही देण्यात आले.
बँकांच्या कर्ज वाटप, तसेच डिजीटल पेमेंट, त्यासाठी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा, वेळोवेळी सादर करण्यात यावे, असेही बैठकीत सांगण्यात आले. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. वरणकरण यांनी बैठकीचे सुत्रसंचलन केले. यावेळी झालेल्या चर्चेत श्री. धुर्वे यांच्यासह बँकांच्या अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 24 दर्पण दिनानिमित्त आज जिल्हाधिकाऱ्यांचे व्याख्यान  नियोजन भवनमध्ये ४ वाजता पत्रकार दिन कार्यक्रम  नांदेड दि. 5 जानेवारी : ...