रब्बी-उन्हाळी हंगामासाठी पाणी-पाळ्यांना
मान्यता, शेतकऱ्यांनाही नियोजनाचे आवाहन
नांदेड, दि. 7 :- जिल्ह्यातील शेतीसाठी रब्बी तसेच उन्हाळी
हंगामासाठी द्यावयाच्या पाणी पाळ्याविषयी नियोजन करण्यात आले असून उर्ध्व पैनगंगा
प्रकल्पांतर्गत पाणी पाळ्यांना (आवर्तन) कालवा सल्लागार समितीने मान्यता दिल्याची
माहिती उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाने दिली आहे.
दरम्यान, इसापूर
प्रकल्पांतर्गत तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प आणि लघुसिंचन प्रकल्पातील
पाण्याचाही सिंचनासाठी पुरेपूर वापर व्हावा असे नियोजन असून, त्यादृष्टीने
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी योग्य पिकांची निवड,
अन्यबाबीसांठी नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे.
उर्ध्व पैनगंगा प्रकल्प
विभाग क्र.-1 च्या कार्यकारी अभियंता यांनी नांदेड जिल्ह्यासाठीच्या पाणी पाळ्या
(आवर्तन)बाबत जाहीर प्रकटन प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर उजवा
मुख्य कालवा कि.मी.119 व इसापूर डावा कालवा कि.मी.84 च्या वितरण व्यवस्थेतंतर्गत
सन 2016-17साठी प्रकल्पात उपलब्ध पाणी साठ्यातून पाणी सोडण्यास मुंबईत नुकताच
जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत
मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार रब्बी हंगामात डिसेंबर 2016 व जानेवारी 2017
या कालावधीत दोन पाळ्या (आवर्तने) देण्यास तर उन्हाळी हंगामात मार्च ते जून 2017
या कालावधीत तीन पाळ्या (आवर्तने) देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यानुसार
कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा काटकसरीने वापर करून, पाणी-पाळ्याचे
वेळापत्रक लक्षात घेऊन, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन करावे. तसेच
त्यानुसार सिंचन क्षेत्राची मागणी गृहीत धरू
न विहीत नियमानुसार आपल्याशी संबंधित
कार्यालयात अर्ज व देय पाणी पट्टी भरावी, असे आवाहनही जलसंपदा विभागाच्यावतीने
प्रकटनात करण्यात आले आहे.
तत्पुर्वी, जिल्ह्यातील
रब्बी व उन्हाळी पाण्याच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी नांदेड
पाटबंधारे मंडळ व इतरही संबंधित यंत्रणांकडून नुकताच आढावा घेतला. या आढाव्यानंतर जिल्ह्यातील
आमदुरा, बळेगाव आणि डिग्रस या प्रकल्पांत पुरेसे पाणी साठले आहे. त्यामुळे या
परिसरातील शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने रब्बी –उन्हाळी हंगामात घ्यावयाच्या पिकांचे
नियोजन करावे, असे आवाहनही करण्यात आले. बंधाऱ्यावरील पाणी वापराबाबत संबंधित
यंत्रणेकडे म्हणजेच नांदेड पाटबंधारे मंडळाच्या उत्तर व दक्षिण विभागांकडे
पुर्वपरवानगी घेऊन, हे पाणी सिंचनासाठी वापरता येणार आहे. त्यादृष्टीने
शेतकऱ्यांनी व संबंधित संस्था आदींनी वेळेत अर्ज करावेत, असे आवाहनही पाटबंधारे
विभागाने केले आहे.
जिल्हयातील मोठ्या
प्रकल्पातील पाणी-पाळ्यांचे आणि अंतर्गत साठवण प्रकल्प, बंधारे आदीं ठिकाणी पुरेसे
पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी आतापासूनच चांगले नियोजन करावे.
आवश्यक तेथे कृषि विभागाशी संपर्क-समन्वय ठेवून मार्गदर्शन, सल्ला घ्यावा असे
आवाहनही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment